समुपदेशकाची डायरी – एका 8 वर्षाच्या मुलाची गोष्ट

Table of Contents

लहान मुलांसोबत काम करताना वारंवार एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, मुले मुद्दाम चूक करत नाहीत; अनेकदा पालक म्हणून आपण काही बाबतीत कमी पडत असतो. समुपदेशनाची गरज मुलांपेक्षा कधी कधी पालकांना अधिक असते. काही दिवसांपूर्वी समोर आलेला एक प्रसंग याचेच उदाहरण आहे.

इयत्ता दुसरीत शिकणारा ८ वर्षांचा मुलगा. वर्गात शिक्षक नसल्याचे त्याने पाहिले. त्याने खुर्ची ओढली, कपाटावर ठेवलेली किल्ली काढली, त्या किल्लीने कपाट उघडले आणि आत ठेवलेला रूम फ्रेशनर (स्प्रे) बाहेर काढून एका मुलाच्या चेहऱ्यावर फवारला. मुलगा रडू लागला. आवाज ऐकून शिक्षक वर्गात आले. जखमी मुलाला तात्काळ डॉक्टरांकडे पाठवण्यात आले आणि संबंधित मुलाची शाळा बंद करण्यात आली.

आता प्रश्न होता — या ८ वर्षांच्या मुलाचे समुपदेशन कसे करायचे?

या वयातील मुलांचा मेंदू अजून विकसित होत असतो. विशेषतः निर्णयक्षमता आणि परिणामांचा अंदाज बांधण्याशी संबंधित भाग प्रीफ्रंटल कॉर्टेक्स पूर्ण विकसित झालेला नसतो. त्यामुळे ही कृती त्याने खोल विचार करून केली असे म्हणणे योग्य ठरणार नव्हते. म्हणूनच शिक्षा किंवा निष्कर्ष काढण्याआधी संवाद आवश्यक होता.

संवादातून उलगडलेले सत्य

शाळेत शिक्षकांनी आणि घरी पालकांनी त्याच्यावर राग व्यक्त केला होता. त्यामुळे “मी चूक केली आहे” याची त्याला जाणीव होती. तो शांत होता. प्रथम त्याला विश्वासात घेतले. मग हळूहळू विचारले “असे काही तू आधी कुठे पाहिले आहेस का?”

तेव्हा तो बोलू लागला.

त्याने टेडी नावाचा चित्रपट पाहिला होता. त्या चित्रपटात टेडीवर हल्ला होत असताना टेडी टेबलावर चढतो, किल्ली काढतो, गाडीचे दार उघडतो आणि आतून स्प्रे घेऊन हल्लेखोराच्या चेहऱ्यावर फवारतो. त्या युक्तीने तो स्वतःची सुटका करतो. हा प्रसंग सांगताना मुलाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते की तो प्रसंग अजूनही त्याच्या डोळ्यासमोर जिवंत आहे.

हे वर्तन चित्रपटातून आले असावे का?

हो — आणि ते कसे घडले हे आपण पाच टप्प्यांत समजू शकतो.

  • निरीक्षण : मुलाने टेडीची कृती बारकाईने पाहिली — टेबलावर चढणे, किल्ली घेणे, दार उघडणे, स्प्रे करणे.
  • आकर्षण आणि ओळख : टेडी धाडसी होता. संकटातून सुटला. त्यामुळे त्या वर्तनाशी मुलाची भावनिक ओळख तयार झाली. “असे करणे म्हणजे शूरपणा” अशी कल्पना मनात बसली.
  • स्मरण : भावनिक प्रभावामुळे हा प्रसंग त्याच्या स्मरणात ठसला. वारंवार आठवणीमुळे तो दीर्घकालीन स्मरणात साठला.
  • अनुकरण : शाळेतही त्याला समान परिस्थिती दिसली — किल्ली, बंद कपाट, आत स्प्रे. मेंदूने तत्काळ जोडणी केली आणि त्याने कृतीची पुनरावृत्ती केली.
  • परिणामांचा विचार न करणे : चित्रपटात टेडी “नायक” ठरतो. पण प्रत्यक्ष आयुष्यात इजा होऊ शकते, हे समजण्याची क्षमता अजून पूर्ण विकसित नव्हती.

मानसशास्त्रीय आधार

मानसशास्त्रज्ञ Albert Bandura यांनी मांडलेल्या सामाजिक शिक्षण सिद्धांतानुसार मुले निरीक्षणातून शिकतात. त्यांच्या Bobo Doll प्रयोगातून हे स्पष्ट झाले की मुले प्रौढांच्या किंवा नायकांच्या आक्रमक वर्तनाचे अनुकरण करतात.

८ वर्षांच्या मुलामध्ये वास्तव आणि काल्पनिक जग यातील सूक्ष्म फरक पूर्णपणे समजण्याची क्षमता अजून विकसित होत असते. त्याने पाहिलेला प्रसंग त्याला “संकटावर मात करण्याची पद्धत” वाटली. त्यातून त्याने नायकत्व (heroism) आत्मसात केले.

अशा वेळी पालकांनी काय करावे?

तत्काळ शिक्षा देऊ नये.
शिक्षा भीती निर्माण करते; समज वाढवत नाही.

  • संवाद साधावा : “तू असे का केलेस?” यामागील कारण समजून घ्यावे.
  • प्रभावी घटक ओळखावेत : हे वर्तन त्याने कुठे पाहिले? कोणत्या माध्यमातून शिकले?
  • परिणामांची जाणीव करून द्यावी : अशा कृतीमुळे स्वतःला आणि इतरांना कसा धोका होऊ शकतो हे शांतपणे समजावावे.
  • परिसर सुरक्षित ठेवावा : धोकादायक वस्तू मुलांच्या सहज आवाक्यात नसाव्यात.
  • वयाला अनुरूप कंटेंट निवडावा : चित्रपटांची U, U/A, A अशी रेटिंग तपासावी, YouTube, reels किंवा इतर माध्यमांवरील सामग्रीवर देखरेख ठेवावी.
  • चित्रपटानंतर चर्चा करावी : “हे काल्पनिक आहे.”, “खऱ्या आयुष्यात असे केल्यास काय होईल?” — अशा प्रश्नांमधून समज वाढते.

मुलांचे वर्तन ही त्यांच्या शिकण्याची प्रक्रिया असते. ते जाणीवपूर्वक चुका करत नाहीत; ते निरीक्षणातून शिकत असतात.

पालक म्हणून आपण जितका संवाद वाढवू, तितके मुलांचे विचार स्पष्ट होतील. योग्य मार्गदर्शन, सुरक्षित वातावरण आणि सजग कंटेंट निवड हेच खरे प्रतिबंधात्मक समुपदेशन आहे.

मुले चुकत नाहीत; ती शिकत असतात.
प्रश्न एवढाच आहे आपण त्यांना काय शिकू देत आहोत?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Read also

RAPID METHOD
R.A.P.I.D Method प्रतिक्रिया नाही, प्रतिसाद द्या!

R.A.P.I.D Method ही भावना नियंत्रण (Emotional Regulation) सुधारण्यासाठी वापरली जाणारी प्रभावी मानसशास्त्रीय पद्धत आहे. ही तंत्रे प्रतिक्रिया (Reaction) ऐवजी विचारपूर्वक प्रतिसाद (Response) देण्यास मदत करते.

Read More »
Mistakes Parents make while choosing career for children
मुलांचे करिअर निवडताना तुम्हीही याच चुका करत आहात का ?

आपल्या पाल्याचे करिअर स्थिर असावे, त्याने आयुष्यात प्रगती करावी आणि आनंदी रहावे अशी प्रत्येक पालकाची अपेक्षा असते. करियर निवडीसाठी दहावी आणि बारावी हे दोन टप्पे

Read More »
आपल्या मुलांसाठी योग्य चित्रपट कसे निवडावे ?

आजच्या डिजिटल युगात चित्रपट, वेबसीरिज आणि विविध प्रकारचा व्हिडिओ कंटेंट काही सेकंदांत उपलब्ध होतो. मोबाईल, टॅब, स्मार्ट टीव्ही यांच्या माध्यमातून मुले सहजपणे विविध प्रकारचे आशय

Read More »
Scroll to Top

Get updates on whatsapp

"*" indicates required fields

Name*
Receive Updates about*