सगळे मीच करतो… Micro management

Table of Contents

काही दिवसांपूर्वी एका शाळेत मुख्याध्यापक सरांसोबत चर्चा सुरू होती. शिक्षकांचे प्रशिक्षण घेताना तुम्हाला काही मुद्दे त्यात समाविष्ट करावे वाटत आहेत का ? या प्रश्नावर ते म्हणाले.

“शिक्षकांची प्रोडक्टिव्हिटी कमी झाली आहे. प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा मलाच करावा लागतो. सगळा भार माझ्यावर येतो. कुणीच स्वतःहून काही करत नाही. या मुद्द्यावर काही करता आले तर पहा.”

हे वाक्य ऐकल्यानंतर सुरुवातीला मलाही वाटले की कदाचित शिक्षकांमध्ये उत्साह कमी झाला असेल किंवा जबाबदारीची भावना कमी झाली असेल. प्रशिक्षण सत्रादरम्यान ब्रेकमध्ये काही शिक्षकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. तुमचे मुख्याध्यापक कसे आहेत ? त्यांच्यासोबत काम करताना काय जाणवते? याप्रश्नावर शिक्षक म्हणाले

“सर खूप मेहनती आहेत.”

“त्यांना प्रत्येक गोष्ट अगदी परफेक्ट हवी असते.”

“आम्ही काही काम केलं तरी ते पुन्हा तपासतात.”

“शेवटी सरांना हवं तसंच करावं लागतं.”

मुख्याध्यापकांविषयी कुणाच्याही मनात नाराजी नव्हती पण संवादातून एक वेगळीच गोष्ट समोर येत होती. शिक्षक आपली जबाबदारी पार पाडत होते, पण ती जबाबदारी ‘ आपलीच ‘ आहे ही भावना दिसून येत नव्हती.

दोन्ही बाजू ऐकल्यानंतर माझ्या मनात एकच संकल्पना आली ‘मायक्रो मॅनेजमेंट

मायक्रो मॅनेजमेंट म्हणजे नेमके काय?

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, टीममधील प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीवर स्वतः लक्ष ठेवणे, प्रत्येक निर्णयात स्वतः सहभागी होणे, काम सोपवल्यानंतरही त्यावर सतत नियंत्रण ठेवणे आणि प्रत्येक गोष्टीची अंतिम जबाबदारी स्वतःकडे ठेवणे म्हणजे मायक्रो मॅनेजमेंट.

याचा अर्थ असा नाही की संबंधित व्यक्तीचे नेतृत्व चुकीचे आहे.

उलट अनेकदा मायक्रो मॅनेज करणाऱ्या व्यक्ती अत्यंत प्रामाणिक, मेहनती आणि कामाबद्दल तळमळ असणाऱ्या असतात. समस्या त्यांच्या हेतूमध्ये नसते. समस्या त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये असते.

मायक्रो मॅनेजमेंटची सुरुवात कशी होते?

मायक्रो मॅनेजमेंटची सुरुवात अनेकदा जबाबदारीच्या भावनेतून होते.

आपल्या कार्यक्षेत्राची प्रतिमा चांगली राहावी, कामात चुका होऊ नयेत, वरिष्ठांकडून प्रश्न येऊ नयेत, पालक समाधानी राहावेत, आपली निवड योग्य ठरावी अशा अनेक गोष्टींची काळजी लीडरच्या मनात असते.

सुरुवातीला तो फक्त मदत करतो.

नंतर तो मार्गदर्शन करतो.

मग तो प्रत्येक गोष्ट तपासू लागतो.

आणि काही काळानंतर त्याला वाटू लागते की प्रत्येक गोष्ट त्यानेच पाहिली पाहिजे.

याच टप्प्यावर नेतृत्व आणि नियंत्रण यांच्यातील सीमारेषा धूसर होऊ लागते.

मायक्रो मॅनेजमेंटमागील मानसशास्त्र

अनेकांना वाटते की मायक्रो मॅनेज करणारी व्यक्ती इतरांवर विश्वास ठेवत नाही. काही वेळा हे खरे असू शकते, पण प्रत्येक वेळी याच्या मुळाशी अविश्वासच असेल असे नाही.

बर्‍याचदा त्यामागे चिंता (Anxiety) असते.

“जर चूक झाली तर?”

“जर काम वेळेत झाले नाही तर?”

“जर वरिष्ठांनी प्रश्न विचारले तर?”

“जर माझ्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले तर?”

अशा अनेक शक्यता सतत मनात फिरत असतात. अनिश्चिततेमुळे निर्माण होणारी अस्वस्थता कमी करण्यासाठी व्यक्ती अधिकाधिक नियंत्रण ठेवू लागते.

तिला वाटते की ती निर्माण होणारी समस्या टाळत आहे.

प्रत्यक्षात ती एक नवीन समस्या निर्माण करत असते.

जितके नियंत्रण वाढते, तितकी टीमची स्वायत्तता कमी होते.

सुरुवातीला दिसणारे फायदे

वरकरणी पाहिले तर मायक्रो मॅनेजमेंटचे काही फायदेही दिसतात.

  • कामाचा दर्जा काही काळ टिकून राहतो.
  • तुलनेने चुका कमी होतात.
  • नवीन कर्मचाऱ्यांना सुरुवातीला दिशा मिळते.
  • महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये समन्वय राखणे सोपे जाते.
  • संस्थेच्या प्रक्रियांमध्ये एकसारखेपणा राहतो.

म्हणूनच अनेक लीडर्स ना सुरुवातीला ही पद्धत प्रभावी वाटते.

टीममधील लोक कसे दुखावतात?

समजा तुम्ही एखादे काम मनापासून केले आहे. त्यासाठी वेळ दिला आहे. विचार केला आहे. जबाबदारीने ते पूर्ण केले आहे.

पण प्रत्येक वेळी तुमचे काम पुन्हा तपासले जाते.

प्रत्येक निर्णयावर प्रश्न उपस्थित होतो.

प्रत्येक प्रस्तावात बदल केले जातात.

अशा वेळी तुम्हाला काय वाटेल?

कदाचित कोणीही उघडपणे बोलणार नाही. पण “माझ्यावर पूर्ण विश्वास नाही.” ही एक भावना मनात निर्माण होऊ लागते.

हा अनुभव वारंवार येऊ लागला की माणूस पुढाकार घेणे कमी करतो. तो सुरक्षित पर्याय निवडतो. नवीन कल्पना मांडण्याऐवजी आदेशांची वाट पाहतो.

टीममधील लोक काम करतात, पण त्यांची अंतर्गत प्रेरणा हळूहळू कमी होत जाते.

प्रोडक्टिव्हिटीवर होणारा परिणाम

गंमत म्हणजे मायक्रो मॅनेजमेंटची सुरूवात प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी होत असली तरी कालांतराने तीच प्रोडक्टिव्हिटी कमी करू लागते.

कारण प्रत्येक निर्णयासाठी एकाच व्यक्तीकडे जावे लागते.

प्रत्येक मंजुरीची वाट पाहावी लागते.

प्रत्येक समस्येचे उत्तर एकाच ठिकाणी शोधले जाते.

यामुळे पुढील गोष्टी घडतात:

  • निर्णय घेण्याचा वेग कमी होतो.
  • कर्मचाऱ्यांची स्वायत्तता कमी होते.
  • समस्या सोडवण्याची क्षमता विकसित होत नाही.
  • नेतृत्वाची दुसरी फळी तयार होत नाही.
  • टीममध्ये मालकीची आणि जबाबदारीची भावना कमी होते.

अशा वेळी काम चालू राहते, पण तिची वाढ मर्यादित होते.

सर्वात जास्त नुकसान कोणाचे होते?

अनेकांना वाटते की मायक्रो मॅनेजमेंटचा त्रास फक्त टीमला होतो.

प्रत्यक्षात सर्वात जास्त नुकसान लीडरचेच होते.

कारण सगळ्यांचे प्रश्न त्याच्याकडे येतात.

सगळे निर्णय त्यालाच घ्यावे लागतात.

सगळ्या जबाबदाऱ्या त्याच्यावर येतात.

हळूहळू त्याला वाटू लागते की तोच सर्वांचा आधारस्तंभ आहे.

परंतु याच प्रक्रियेमुळे ताण वाढतो, मानसिक थकवा वाढतो आणि कामाचा आनंद कमी होतो.

काही काळानंतर तोच लीडर म्हणताना दिसतो

“सगळे मीच करतो.”

हे वाक्य ऐकताना नेहमी एक प्रश्न विचारावा वाटतो — खरंच सगळे तुम्हीच करता, की तुम्ही इतरांना करू देत नाही?

मायक्रो मॅनेजमेंटमधून बाहेर कसे यावे?

यासाठी कोणतेही जादूचे सूत्र नाही. पण काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतात.

सर्वप्रथम स्वतःला एक प्रश्न विचारावा लागतो:

“हे काम मीच करणे आवश्यक आहे का, की मला ते सोडून द्यायला अवघड जात आहे?”

हा प्रश्न अनेकदा अस्वस्थ करणारा असतो. पण बदलाची सुरुवात इथूनच होते.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कामासोबत अधिकार देणे. अनेक लीडर काम सोपवतात, पण निर्णय घेण्याचा अधिकार स्वतःकडे ठेवतात. त्यामुळे जबाबदारी दिल्यासारखी वाटते, पण प्रत्यक्षात व्यक्ती स्वतंत्रपणे काम करू शकत नाही.

तिसरी गोष्ट म्हणजे चुका स्वीकारण्याची तयारी ठेवणे. कोणतीही टीम चुका न करता शिकत नाही. मुलाला सायकल शिकवताना आपण कायम सीट धरून ठेवली तर तो पडत नाही, पण तो सायकल चालवायलाही शिकत नाही.

टीमबाबतही हेच लागू होते.

खरे नेतृत्व कुठे सुरू होते?

खरे नेतृत्व तेव्हा सुरू होते जेव्हा लीडर स्वतःला अपरिहार्य बनवण्याचा प्रयत्न सोडतो.

तो प्रत्येक निर्णय स्वतः घेण्यापेक्षा निर्णय घेणारी माणसे तयार करतो.

तो प्रत्येक काम स्वतः करण्यापेक्षा काम करणारे लोक घडवतो.

तो प्रत्येक चूक रोखण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा चुका करून शिकण्याची सवय निर्माण करतो.

हे अवघड आहे. कारण यासाठी संयम लागतो. विश्वास लागतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या नियंत्रणाच्या गरजेवर मात करावी लागते.

आत्मपरीक्षणासाठी काही प्रश्न

  • माझ्या अनुपस्थितीत टीम किती निर्णय घेऊ शकते?
  • लोक माझ्याकडे परवानगीसाठी येतात की मार्गदर्शनासाठी?
  • मी काम तपासतो की कामावर नियंत्रण ठेवतो?
  • माझ्या टीममधील लोक चुका करण्यास घाबरतात का?
  • जर मी एक आठवडा सुट्टीवर गेलो, तर कामकाज सुरळीत चालेल का?

या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे अनेकदा आपल्याला आपली नेतृत्वशैली समजून घेण्यास मदत करतात.

शेवटचे काही शब्द

मला त्या मुख्याध्यापक सरांशी झालेली चर्चा अजूनही आठवते. त्यांची तक्रार चुकीची नव्हती. त्यांना खरोखरच सगळा भार स्वतःवर असल्यासारखे वाटत होते.

पण शिक्षकांशी बोलल्यानंतर एक वेगळी बाजू दिसली.

समस्या शिक्षकांच्या क्षमतेत नव्हती. समस्या अशी होती की त्यांना त्यांच्या क्षमतेचा वापर करण्यासाठी पुरेशी जागा मिळत नव्हती.

कदाचित आपल्या भोवतालच्या अनेक संस्था, शाळा आणि कार्यालयांमध्येही असेच घडत असेल.

टीम मधील लोक काम का करत नाहीत हा या पेक्षा आपण त्यांना काम करण्याची, निर्णय घेण्याची आणि चूक करण्याची मोकळीक दिली आहे का? हा प्रश्न लीडर्स ने स्वतःला विचाराला हवा.

कारण शेवटी नेतृत्वाची खरी ओळख आपण किती काम करतो यात नसते.

आपण नसताना काम किती व्यवस्थित चालते, यात असते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Read also

RAPID METHOD
R.A.P.I.D Method प्रतिक्रिया नाही, प्रतिसाद द्या!

R.A.P.I.D Method ही भावना नियंत्रण (Emotional Regulation) सुधारण्यासाठी वापरली जाणारी प्रभावी मानसशास्त्रीय पद्धत आहे. ही तंत्रे प्रतिक्रिया (Reaction) ऐवजी विचारपूर्वक प्रतिसाद (Response) देण्यास मदत करते.

Read More »
Mistakes Parents make while choosing career for children
मुलांचे करिअर निवडताना तुम्हीही याच चुका करत आहात का ?

आपल्या पाल्याचे करिअर स्थिर असावे, त्याने आयुष्यात प्रगती करावी आणि आनंदी रहावे अशी प्रत्येक पालकाची अपेक्षा असते. करियर निवडीसाठी दहावी आणि बारावी हे दोन टप्पे

Read More »
आपल्या मुलांसाठी योग्य चित्रपट कसे निवडावे ?

आजच्या डिजिटल युगात चित्रपट, वेबसीरिज आणि विविध प्रकारचा व्हिडिओ कंटेंट काही सेकंदांत उपलब्ध होतो. मोबाईल, टॅब, स्मार्ट टीव्ही यांच्या माध्यमातून मुले सहजपणे विविध प्रकारचे आशय

Read More »
Scroll to Top

Get updates on whatsapp

"*" indicates required fields

Name*
Receive Updates about*