स्वातंत्र्य म्हणजे मर्यादांचा अभाव नव्हे

Table of Contents

लक्ष्मणाने सीतेसाठी आखलेली रेषा ही बंधन नव्हती, तर सुरक्षिततेसाठीची एक स्पष्ट सीमा होती. त्या रेषेचा उद्देश सीतेला रोखणे नसून तिला वाचवणे हा होता. रावणाने संरक्षक रेषेवर थेट हल्ला न करता सीतेच्या मानसिकतेवर आघात केला आणि सीतेला रेषा ओलांडायला भाग पाडले. लक्ष्मणरेषा ही केवळ धार्मिक किंवा पौराणिक घटना म्हणून पाहण्याऐवजी, ती मानवी मनाच्या कार्यप्रणालीचे एक मानसशास्त्रीय रूपक म्हणून समजून घेण्याचा आज प्रयत्न करू.

सीता म्हणजे मन, लक्ष्मण म्हणजे विवेक

मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले, तर सीता हे मानवी मनाचे प्रतिक आहे. मन स्वभावतः संवेदनशील असते, दयाळू असते आणि समोरच्याच्या वेदनांना सहज प्रतिसाद देते. लक्ष्मण हा विवेकाचा, अनुभवातून आलेल्या समजुतीचा आणि अंतर्गत शहाणपणाचा प्रतिक आहे. विवेक आपल्याला आदेश देत नाही, तो फक्त एक सीमा दाखवतो.

लक्ष्मणरेषा : मानसशास्त्रीय बॉण्डरी

लक्ष्मणरेषा म्हणजे आपण स्वतःसाठी आखलेल्या मानसशास्त्रीय सीमा. या सीमा भावनिक, सामाजिक आणि नैतिक स्वरूपाच्या असतात. आपण कुठे ‘नाही’ म्हणायचे, कुठे थांबायचे, कुठल्या परिस्थितीत स्वतःला मागे घ्यायचे या सगळ्याची जाणीव म्हणजे मानसिक बॉण्डरी. संशोधन सांगते की ज्या व्यक्तींच्या बॉण्डरी स्पष्ट असतात, त्या व्यक्ती भावनिकदृष्ट्या अधिक स्थिर, आत्मविश्वासी आणि सुरक्षित असतात.

रावण : प्रलोभनांचे मानसशास्त्र

रावण हे येथे एखादी व्यक्ती नसून, प्रलोभनांचे प्रतिक आहे. व्हॅलिडेशनची गरज, स्वीकारले जाण्याची इच्छा, अपराधभाव, एकटेपणाची भीती—ही सगळी आधुनिक रावणाची हत्यारे आहेत. “तू मदत केली नाहीस तर तू चांगली व्यक्ती नाहीस”, “माझ्यासाठी एवढंही करू शकत नाहीस?” अशा भावनिक दबावातून मनाला विवेकाने आखलेली रेषा ओलांडायला भाग पाडले जाते.

विवेक शांत असतो, प्रलोभन गोंगाट करणारी असतात.

लक्ष्मण रेषा आखून निघून गेला; तो सीतेजवळ उभा राहिला नाही. विवेकही तसाच असतो. तो शांत असतो, नाट्य करत नाही. उलट प्रलोभने गोंगाट करतात, भावनिक अस्थिरता निर्माण करतात आणि तात्काळ निर्णय घ्यायला भाग पाडतात. अशा क्षणी मन विवेकाचा आवाज ऐकण्याऐवजी भावनेच्या मागे जाते आणि तिथेच सीमा ओलांडली जाते.

सीमाभंग आणि त्यानंतरचे suffering

सीता रेषा ओलांडते आणि suffering सुरू होते. मानसशास्त्रात suffering ला शिक्षा मानले जात नाही; ती एक संकेत प्रणाली आहे. जेव्हा आपण वारंवार आपल्या सीमांचे उल्लंघन करतो, तेव्हा चिंता वाढते, आत्मसन्मान कमी होतो, नात्यांमध्ये चिडचिड आणि ताण निर्माण होतो. हे सगळे संकेत असतात की आपण स्वतःशी प्रामाणिक राहिलो नाही.

प्रत्येक सीमा तोडणं म्हणजे स्वातंत्र्य नव्हे

आज स्वातंत्र्याची व्याख्या अनेकदा चुकीच्या अर्थाने वापरली जाते. सीमा म्हणजे बंधन आणि बंधन म्हणजे गुलामगिरी असा सरळ निष्कर्ष काढला जातो. पण मानसशास्त्र सांगते की खरे स्वातंत्र्य म्हणजे सर्व काही करणे नव्हे, तर काय करू नये हे ओळखण्याची क्षमता. सीमा नसलेले मन सतत उपलब्ध राहते आणि शेवटी मानसिकदृष्ट्या थकते.

निष्कर्ष : लक्ष्मणरेषा भीतीची नव्हे, शहाणपणाची रेषा

लक्ष्मणरेषा ही भीतीची भिंत नाही; ती अनुभवातून आलेल्या शहाणपणाची खूण आहे. प्रत्येक प्रलोभन स्वीकारण्यासारखे नसते आणि प्रत्येक भावनिक विनंतीला होकार देणे ही करुणा नसते. कधी कधी स्वतःला वाचवणे हीच सर्वात मोठी मानसिक जबाबदारी असते.
स्वातंत्र्य म्हणजे मर्यादांचा अभाव नसून, मर्यादा ओळखण्याची जाणीव निर्माण होणे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Read also

आपल्या मुलांसाठी योग्य चित्रपट कसे निवडावे ?

आजच्या डिजिटल युगात चित्रपट, वेबसीरिज आणि विविध प्रकारचा व्हिडिओ कंटेंट काही सेकंदांत उपलब्ध होतो. मोबाईल, टॅब, स्मार्ट टीव्ही यांच्या माध्यमातून मुले सहजपणे विविध प्रकारचे आशय

Read More »
समुपदेशकाची डायरी – एका 8 वर्षाच्या मुलाची गोष्ट

इयत्ता दुसरीत शिकणारा ८ वर्षांचा मुलगा. वर्गात शिक्षक नसल्याचे त्याने पाहिले. त्याने खुर्ची ओढली, कपाटावर ठेवलेली किल्ली काढली, त्या किल्लीने कपाट उघडले आणि आत ठेवलेला

Read More »
प्रेमाची भाषा

प्रेम ही मानवी जीवनातील मूलभूत भावनिक गरज आहे. मात्र अनेकदा नात्यांमध्ये दिसणारे तणाव, गैरसमज आणि दुरावा हे प्रेमाच्या अभावामुळे नसून, प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतीत असलेल्या

Read More »
Scroll to Top

Get updates on whatsapp

"*" indicates required fields

Name*
Receive Updates about*