मानवी मन खूप हुशार असतं. पण त्याच वेळी ते आपल्याला अनेकदा फसवतंही.
हे ऐकायला विचित्र वाटतं, पण आपल्या मेंदूचाच आपल्याला चुकीच्या दिशेने नेणारा हा खेळ खूप जुना आणि खूप सामान्य आहे. मानसशास्त्रात या खेळाला संज्ञानात्मक विचलन—Cognitive Biases म्हणतात.
म्हणजे विचार करताना किंवा निर्णय घेताना मन नकळत काही चुका करते. या चुका खूप लहान असतात की आपल्याला जाणवतही नाही… पण काही प्रसंगात यांचे परिणाम मात्र मोठे होऊ शकतात.अनेकदा यांमुळे नात्यांमध्ये तणाव, चुकीचे करिअर निर्णय, अवास्तव भीती, आणि गैरसमज असे दुष्परिणाम पाहायला मिळतात.
आजचा लेखात आपण सोप्या भाषेत या विचलनांची माहिती घेऊ.
एक लहान प्रसंग
रोहन आणि करुणा ऑफिसमध्ये एकाच टीममध्ये काम करणारे. एका दिवशी रोहनने करुणाला एका प्रोजेक्टसाठी मदत मागितली.
करुणाने उत्तर दिलं, “मी आत्ता थोडी व्यस्त आहे, नंतर बघते.”
रोहनला लगेच वाटलं — “करुणाला माझ्यासोबत काम करायलाच आवडत नाही.”
दुसऱ्या दिवशी करुणाने चांगलं काम केलं, पण रोहनच्या डोक्यात पहिल्या दिवशीचीच भावना घर करून बसलेली. तो तिच्या प्रत्येक गोष्टीत नकारात्मकता दृष्टिकोन ठेवून विचार करू लागला.
एखादी घटना, एक शब्द, एखादा चेहरा यावर प्रभावित होऊन मेंदू त्यातूनच पुढची कथा तयार करतो. ही कथा कधी निराधार असते, कधी गैरसमजांवर आधारित, याच मेंदूच्या स्वभावाला आपण विचलन म्हणतो. आता हे विचलन काय आहेत, कसे काम करतात, आणि त्यांच्यापासून स्वतःला कसे वाचवायचे — हे आपण पायरी-पायरीने पाहू.
संज्ञानात्मक विचलन म्हणजे नक्की काय?
गोष्टी समजायला आपला मेंदू खूप शॉर्टकट्स वापरतो. हा मेंदूचा वेळ आणि ऊर्जा वाचवण्याचा मार्ग आहे. पण हे शॉर्टकट्स नेहमीच अचूक नसतात.
यामुळे आपण अनेकदा:
- चुकीचे निष्कर्ष काढतो
- चुकीचे निर्णय घेतो
- परिस्थिती चुकीच्या पद्धतीने समजतो
- दुसऱ्यांच्या वर्तनावर चुकीचा अर्थ लावतो
- स्वतःबद्दलही चुकीच्या संकल्पना विकसित करतो
ही पद्धतशीर चूक म्हणजेच संज्ञानात्मक विचलन — Cognitive Bias.
हे विचलन का होतात?
- मेंदूचा वेगवान निर्णय मोड : मेंदूला प्रत्येक गोष्ट बारकाईने तपासायला वेळ नसल्याने. त्यामुळे तो म्हणतो: “चला, पटकन अंदाज लावूया.”
- भावना : भीती, असुरक्षितता, राग, कमी आत्मसन्मान — या भावना निष्कर्षांवर जोरदार प्रभाव टाकतात.
- वैयक्तिक अनुभव : आपल्या जुन्या अनुभवांचा मेंदूवर ठसा बसतो, नवीन घटनेचे आकलन बहुतेक वेळा त्या जुन्या ठशाशी जोडून केले जाते.
- सामाजिक संस्कार : आपण ज्या कुटुंबात, समाजात, वातावरणात वाढलो — ते आपल्या विचारांचा पाया बनतात.
महत्त्वाची संज्ञानात्मक विचलने
Confirmation Bias – जे पटतं त्यालाच धरून बसणं
रोहनला आधीपासून वाटत होतं की करुणा त्याला पसंत करत नाही.
म्हणून ती व्यस्त होती हे कारण तो मानायलाच तयार नव्हता.
ती बोलली की त्याला त्रास, ती शांत राहिली तरी त्रास.
मेंदू आधीच ठरवलेलं मत सत्य मानायला लागतो.
Anchoring Bias – पहिले ऐकलेले मत ठाम ठेवणे
दुकानदार म्हणतो: “हा शर्ट 2000 रुपये आहे. पण तुम्हाला 1200 मध्ये देतो.”
पहिली किंमत ऐकून 1200 स्वस्त वाटतं…
तेव्हा बाजारभाव खरं तर 800 असतो!
नात्यातही असंच होतं —
पहिली छाप चांगली असेल तर पुढची चूक छोटी वाटते; पहिली छाप खराब असेल तर पुढची चांगली कृतीही कमी वाटते.
Availability Bias – जे पटकन आठवतं तेच खरे
टीव्हीवर सतत अपघातांच्या बातम्या दाखवल्या तर वाटतं की अपघात खूप वाढले.
पण प्रत्यक्षात कदाचित प्रमाण तेवढंच असतं.
छोट्या मुलांची आई म्हणते: “माझ्या शेजारच्या मुलाला ताप आला. म्हणजे तापाचा फैलाव वाढतोय.”
असं नसतं — फक्त आठवण ताजी असते.
Halo Effect – एक गुण, संपूर्ण चांगुलपणा
क्लासमध्ये एक मुलगा खूप स्मार्ट दिसतो.
शिक्षकही समजतात: “हा मुलगा नक्की हुशार असेल.”
कदाचित नसतोही.
कामाच्या ठिकाणीही —
जो व्यक्ती व्यवस्थित बोलतो, त्याला “खूप जबाबदार” मानलं जातं.
Horn Effect – एक चूक, संपूर्ण वाईटपणा
तुमचा सहकारी एकदा कामात चुका करतो.
बस्स. त्याला “नेहमीच निष्काळजी” अशी लेबल मिळते.
Self-Serving Bias – यश माझं, अपयश परिस्थितीचं
परीक्षेत जास्त गुण — “मी मेहनत केली.”
कमी गुण — “पेपरच अवघड होता.”
ऑफिसमध्येही —
चांगला प्रोजेक्ट झाला की आपली कामगिरी;
चूक झाली की दुसऱ्यांची जबाबदारी.
Fundamental Attribution Error – स्वभावाचा दोष
कोणी गाडी आडवी लावली तर “याचा स्वभावच असा असणार.”
आपण लावली तर “सॉरी, मला घाई होती.”
Survivorship Bias – फक्त यशस्वी लोक दिसतात
YouTube वर “मी 21 व्या वर्षी करोडपती झालो” असे व्हिडिओ.
लोक म्हणतात: “मीही करू शकतो!”
पण अपयशी झालेले, खरे अनुभव सांगणारे यांना दिसतच नाहीत, ते जाणीवपूर्वक इग्नोर केले जातात.
Dunning-Kruger Effect – कमी माहिती असलेलेच जास्त आत्मविश्वासात
दोन व्हिडिओ बघून कोणी म्हणतं: “मला share market कळतं.”
किंवा “मला psychology चांगली जमते.”
Negativity Bias – नकारात्मक गोष्टी जास्त ठळक
कोणी 10 वेळा मदत केली आणि एकदा तुम्हाला दुर्लक्ष झाल्यासारखं वाटलं…
मेंदू त्या एक नकारात्मक घटनेलाच धरून बसतो.
हे विचलन आपल्या जीवनावर कसा प्रभाव टाकतात?
नातेसंबंध
- एक वाक्य — आणि गैरसमज वाढतो.
- पार्टनरच्या चुकीवरच लक्ष केंद्रित होतं.
- जुने अनुभव नवीन नात्यांवर टाकले जातात.
कामाचे ठिकाण
- एखादा कर्मचारी पहिल्या आठवड्यातच शांत असेल, तर “तो स्लो आहे” असं ठरवणं.
- मुलाखतीत पहिल्या 2 मिनिटांत निर्णय होणे.
- सहकाऱ्यांच्या बोलण्यावर भावनिक प्रतिक्रिया.
विद्यार्थ्यांच्या जगात
- “Math कठीण आहे” हा पक्का समज — आणि त्या विचाराने कामगिरी खालावणे.
- एखाद्या मित्राने सांगितलेल्या अफवा पटकन खऱ्या मानणे.
कुटुंबात
- मोठ्यांच्या विचारांवर आधीचे अनुभव प्रभाव टाकतात.
- लहान मुलांविषयी “हा खोडकरच आहे” असा ठसा कायम राहतो.
हे विचलन ओळखायचे कसे?
- थोडं थांबा : मनात येणारा पहिला विचार बहुतेकदा भावनिक असतो. तो लगेच अंतिम मानू नका.
- स्वतःला प्रश्न विचारा : “मी हा निष्कर्ष कोणत्या पुराव्याने काढतोय?”, “याच्या उलट उदाहरणे आहेत का?”
- परिस्थिती आणि व्यक्ती वेगळी ठेवा : एखाद्याने चुकीचे बोलले तर ते त्याच्या स्वभावामुळे की परिस्थितीमुळे?
- तटस्थ माहिती शोधा : ऐकलेल्या, दिसलेल्या एका घटनेवर निर्णय घेऊ नका.
- दुसऱ्याचा दृष्टिकोन समजून घ्या : ते ज्या स्थितीत होते, ती परिस्थिती काय होती?, हा प्रश्न अर्धा तणाव कमी करतो.
विचलन कमी करण्यासाठी उपयुक्त मानसशास्त्रीय पद्धती
CBT पद्धती (विचारांचे विश्लेषण)
- विचार लिहून काढणे
- त्याचे पुरावे तपासणे
- चुकीचा तर्क ओळखणे
- पर्यायी, वास्तववादी विचार बनवणे
Mindfulness
वर्तमान क्षणात राहायला शिकवलं की मेंदू जुने अनुभव वापरून गैरसमज तयार करत नाही.
भावना ओळखणे
- भावना दाबल्याने विचलन वाढते.
- भावना स्वीकारल्याने स्पष्टता वाढते.
विविध दृष्टीकोनातून पाहणे
एकतर्फी माहिती प्रमाण न समजता, विविध पैलू समोर येतात.
मनाची खेळी ओळखायला शिका
मन खूप वेगवान, सर्जनशील आणि चतुर आहे.
पण त्याच वेळी ते चुकीचे रस्तेही दाखवते.
संज्ञानात्मक विचलने ही आपल्या विचारांचे नैसर्गिक साइड-इफेक्ट आहेत.
त्यांची जाणीव झाली की:
- नातेसंबंध चांगले राहतात
- कामाचे निर्णय स्पष्ट होतात
- मुलांबरोबर संयम वाढतो
- भीती, गैरसमज कमी होतात
- आणि स्वतःकडेही आपण अधिक सौम्य दृष्टीने पाहतो
मानसशास्त्रीय संशोधन सांगते की जागरूकता ही या विचलनांवरची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे.



