आपल्या पाल्याचे करिअर स्थिर असावे, त्याने आयुष्यात प्रगती करावी आणि आनंदी रहावे अशी प्रत्येक पालकाची अपेक्षा असते. करियर निवडीसाठी दहावी आणि बारावी हे दोन टप्पे फारच महत्वाचे समजले जातात, या काळात घेतलेल्या निर्णयावर आपल्या पाल्याचे भवितव्य अवलंबून असते.
अनेक पालक करियर संदर्भातील निर्णय सामाजिक समजुती, प्राप्त गुण (मार्क्स) आणि इतरांचे अनुभव या निकषांवर घेतात, त्यामुळे पाल्याच्या करियर वर नकारात्मक परिणाम होण्याची दाट शक्यता असते.
थोडा विचार करा.
मुलांचे करिअर निवडताना तुम्हीही या चुका करत आहात का ?
इतर मुलांशी तुलना करणे
“अमुक काकांचा मुलगा सायन्स घेत आहे, तू पण सायन्सच घे.” या मुळे मुले स्वतःच्या क्षमता समजून न घेता स्पर्धेवर आधारित निर्णय घेतात. यातून पुढे मुलांमध्ये न्यूनगंड, आत्मविश्वास कमी होणे आणि स्वतःबद्दल असमाधान निर्माण होऊ शकते.
प्राप्त गुणांवर (मार्क्सवर) शाखा निवडणे
९०% मिळाले म्हणजे विज्ञान (सायन्स) च घ्यायला हवे, ४५% आहेत तर कला (आर्ट्स) च घ्यावे असे अनेकदा मुलांना सांगितले जाते. वास्तविक गुण ( मार्क्स) हे बुद्धिमत्तेचे एक मोजमाप असते, त्या मुलाचे पूर्ण व्यक्तिमत्व नाही. फक्त मार्क्स वर आधारित निर्णय घेतल्यास मुले पुढे त्या अभ्यासात/ कामात रुची दाखवत नाहीत.
सामाजिक प्रतिष्ठा आणि व्हाईट कॉलर कामे
“डॉक्टर किंवा इंजिनिअर झालात तर आयुष्य सेट होईल.” असा एक भ्रम आपल्याकडे फार प्रचलित आहे, समजात व्हाइट कॉलर किंवा प्रतिष्ठित समजले जाणारे क्षेत्र आपल्या मुलासाठी योग्य असेलच असे नाही. उलट हा दबाव टाकल्याने अभ्यास करताना दडपण येणे, तणाव निर्माण होणे आणि अपयशाची भीती वाटणे असे नकारात्मक परिणाम दिसून येतात.
मुलांची आवड दुर्लक्षित करणे
काही मुलांना लहानपणापासून काही ठराविक गोष्टीत रस असतो, पण अनेकदा ती आवड गंभीरतेने घेतली जात नाही. तुझी आवड आणि करिअर हे दोन वेगळे घटक आहेत असे त्याला सांगितले जाते. असे झाल्यास मुलांचा अभ्यासातील रस आणि सर्जनशीलता (क्रिएटिव्हिटी) कमी होऊ लागते.
मुलांची इच्छा आंधळेपणाने मान्य करणे
“मुलाला जे हवे आहे तेच करू द्या.” असे म्हणणारे पालक देखील आहेत, मुलाची इच्छा जरी महत्वाची असली तरीही त्या करिअरसाठी आवश्यक क्षमता त्याच्याकडे आहेत का? आणि नसल्यास त्याची त्या विकसित करण्याची तयारी आहे का ? हे दोन घटक कायम विचारात घ्यायला हवे. नाहीतर पुढे आपल्या क्षमता आणि अपेक्षा यांच्यातील तफावत मुलात निराशा आणि तणाव निर्माण करते.
करियर पर्यायांच्या माहितीचा अभाव
आजकालच्या काळात अनेक नवनवीन करिअर पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे निर्णय घेताना फक्त पारंपरिक क्षेत्रांचा विचार न करता सर्वसमावेशक विचार करणे आवश्यक आहे. यामुळे मुलांना त्यांच्या क्षमतांना अनुरूप पर्याय निवडता येतो.
मुलांच्या व्यक्तिमत्वाचा विचार न करणे
प्रत्येकाचे व्यक्तिमत्व वेगवेगळे असते. काही मुले संशोधनात (रिसर्च) मध्ये चांगली असतात तर काही खेळात, काहींना कला क्षेत्रात नैपुण्य असते तर काहींना लोकांशी संवाद साधण्याचे कौशल्य अवगत असते. आपल्या मुलाचे व्यक्तिमत्व समजून त्याच्याशी मिळतेजुळते करिअर निवडल्यास त्याला आनंदाने ते काम करता येते आणि समाधानकारक आयुष्य जगता येते.
आपल्या अपूर्ण इच्छा मुले पूर्ण करतील अशी अपेक्षा ठेवणे
आपल्या बालपणी अनेक कारणांनी आपल्याला मनासारखे करियर करता आलेले नसते, अशा वेळी आपण आपल्या मुलांना काय हवे ते देऊ आणि त्यांना ते स्वप्न पूर्ण करायला लावू अशा हेतूने अनेक पालक मुलांना करीयर निवडण्यास सांगतात. पण यात मुलांची आवड (इंटरेस्ट) आणि क्षमता या गोष्टी अनेकदा दुर्लक्षित होतात. मुलांनी भावनिक निर्णय घेऊन यासाठी प्रयत्न जरी सुरू केले तरीही पुढे त्यांच्यात तणाव आणि असमाधान अशी लक्षणे दिसून येतात.
नातेवाईक किंवा परिचित व्यक्तींचा पगार यावर क्षेत्र निवडणे
एखादा नातेवाईक, भाचा, पुतणी किंवा परिचित व्यक्ती हे अमुक क्षेत्रात आहेत आणि चांगला पगार घेत आहेत त्यामुळे आपल्या मुलाने देखील त्यांनी केले तेच करियर निवडावे असा हट्ट अनेक पालकांचा असतो. परंतु अगदी जुळ्या भावंडांमध्ये देखील हा कॉपी पेस्ट फॉर्म्युला काम करत नाही. उलट यातून भविष्यात निराशा आणि तणाव वाढीस लागण्याची शक्यता जास्त असते.
क्लासेस, जाहिराती यांचा प्रभाव
शिक्षण क्षेत्रात अनेक ठिकाणी बाजारीकरण झाले आहे, प्रत्येक विद्यार्थीJEE किंवा NEET सारख्या परीक्षा देऊन IIT किंवा AIMS/ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज) मध्ये जाऊन शिकला तरच त्याचे भविष्य उज्ज्वल आहे असा अपप्रचार अनेकदा केला जातो. मुळात अनेक करियर पर्याय उपलब्ध असताना अशा जाहिरातींना बळी पडून आपण आपल्या पाल्याला अनावश्यक स्पर्धेत ढकलत असतो. हे क्षेत्र वगळता देखील अनेक क्षेत्र आहेत जिथे उत्तम करिअर केले जाऊ शकते.
वैज्ञानिक मार्गदर्शन न घेणे
सर्वात मोठी चूक म्हणजे वैज्ञानिक तज्ञ मार्गदर्शन न घेणे.
मानसशास्त्र सांगते की योग करियर साठी 3 घटक फार महत्वाचे असतात १. क्षमता (Ability), 2. आवड (Interest), 3.व्यक्तिमत्व (Personality)
आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला मुलांना वेळ देणे कठीण जात आहे. दर महिन्याला मुलांचा इंटरेस्ट बदललेला असतो अशा वेळी मुलांच्या क्षमता आणि व्यक्तिमत्व नेमके कसे समजून घ्यावे हा प्रश्न आपल्याला सर्वांना पडतो.
यासाठी मनशास्त्रात कल चाचणी आणि व्यक्तिमत्व आणि क्षमता चाचणी असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, एखादे तज्ञ समुपदेशक तुम्हाला याबद्दल छान मार्गदर्शन करू शकतात.
या तिन्ही गोष्टी समजून घेण्यासाठी अभिव्यक्ती द्वारे प्रतिबिंब – स्वयं मूल्यमापन चाचणी विकसित केली गेली आहे. या चाचणीतून आपल्याला मुलांच्या करिअर विषयक निर्णयात बरीच स्पष्टता मिळण्यास मदत होते. अधिक माहितीसाठी संपर्क : 7588399338
तुम्ही देखील तुमच्या पाल्यासाठी करियर निवडत असाल तर नक्कीच वरील घटकांचा विचार करा.
कायम लक्षात ठेवा
आपण आपल्या पाल्याचे उज्ज्वल भविष्य निवडत आहोत, समाजाला दाखवण्यासाठी एक पदवी नाही…



