भारतात me too ही मोहीम सुरू झाली आणि अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेले लैंगिक अत्याचार उघडपणे सांगायला सुरुवात केली. मला आजही आठवत एका अभिनेत्री ने असाच एका ज्येष्ठ दिग्दर्शकावर आरोप केला होता आणि त्यावरून वातावरण तप्त झाले होते. अनेक लोक म्हणत होते की सदर अभिनेत्री फक्त प्रसिध्दी साठी हे करत असून जर एवढाच अत्याचार होत होता तर त्यांनी आधीच तक्रार का नाही केली ?
गेल्याच आठवड्यात मैत्रिणीने मला विचारलं की या विषयावर कधी लिखाण केले आहे का ? मुळात दिवाळी पासून एक नवीन विषय अभ्यासात असल्याने लिखाण बंद केले होते पण आज त्याचा पुनश्च श्रीगणेशा करत आहे. गेल्या वर्षी वाचनात आले होते की 5 पैकी फक्त 1 महिला त्यांच्यावर झालेल्या sexual assault म्हणजेच लैंगिक छळ/ अत्याचार विरोधात तक्रार करतात आणि ती तक्रार साधारण अत्याचार झाल्यानंतर लगेच करण्याचे प्रमाण फक्त 10% आहे. असे कोणते विचार आहेत जे महिलांना थांबवत असतील यावर आज मी माझ्या विवेक बुद्धी नुसार काही मते मांडत आहे.
खरतर लगेच तक्रार न करण्यामागे अनेक कारणे असू शकतात पण त्यात प्रमुख कारण म्हणजे आपल्यासोबत जे झाले आहे ते सर्वांसमोर मांडणे. जर आपण याचा मानसशास्त्रीय दृष्टिकोन लक्षात घेतला तर ती वाईट घटना पुन्हा आठवून सदर महिलेला शॉक लागू शकतो आणि PTSD म्हणजेच post traumatic stress disorder ची शक्यता वाढू शकते. लैंगिक अत्याचारांचा ट्रॉमा हा खूपच दुःखद आणि भयावह असतो त्यामुळे आपल्या सोबत काय झाले आहे हे समजून घेऊन ते पचवायला खूप वेळ जातो. त्या घटनेची वाच्यता करताना पुन्हा ते सर्व आठवून स्वतःबद्दल घृणा देखील वाटू शकते हे सर्व होऊ नये म्हणून अनेकदा महिला त्वरित अशा घटना रिपोर्ट करत नाहीत.
यानंतर येणारे दुसरे कारण म्हणजे बदनामीची भीती, जगभरात स्त्री चे चारित्र्य तिच्या व्हर्जिनिटी सोबत जोडले जाते एवढच नाही तर तिने अशी तक्रार केल्या नंतर तिलाच वाईट चालीची समजून समाजात बदनाम केले जाते. अनेकदा शोषण करणारा व्यक्ती उलट तक्रार करून पीडित महिलेचे मानसिक खच्चीकरण देखील करतो. हे सर्व टाळण्यासाठी अनेक महिला ह्या घटना बोलून न दाखवणे पसंत करतात.
बरेचदा लैंगिक शोषण करणारी व्यक्ती ही प्रतिष्ठित आणि सामाजिक किंवा व्यावसायिक जीवनात चांगले स्थान भूषवणारी असते. उदा. नोकरीच्या ठिकाणी असलेले सीनिअर किंवा बॉस अश्यावेळी महिलेने तक्रार केल्यास नोकरी वरून बडतर्फ करण्याची भीती असते.
या सर्वांसोबत अजून एक कारण म्हणजे आपले कुटुंब सांभाळायची जबाबदारी, भारतीय संस्कृती ही अजूनही कुटुंब संस्थेत विश्वास ठेवते. लग्न होऊन सासरी गेलेली महिला ही आपला संसार टिकावा म्हणून नवऱ्याने / घरातील अन्य व्यक्तीने केलेले लैंगिक अत्याचार सहन करते. त्यात त्या महिलेला मुल असल्यास त्याच्या भविष्यासाठी अनेकदा ती स्वतःचे हाल कुठेही मांडत नाही. Post marital rape चे प्रमाण जास्त असून देखील आपल्या आई वडील ( कुटुंबाचे) यांची प्रतिष्ठा राखण्यासाठी महिला समोर येऊन तक्रार करत नाहीत.
वेळ गेली की हळू हळू हा ट्रॉमा कमी होऊ लागतो, मग आपल्यासोबत काहीतरी चुकीचे झाले आहे हे स्वीकारले जाते आणि या महिला समोर येऊन ते मांडू लागतात. अनेकदा असा युक्तिवाद करण्यात येतो की महिलेने 10 वर्षांनी तक्रार केली आहे आता त्या पुरुषाचे भवितव्य का खराब करायचे ? तर अशावेळी मी म्हणेन की ते भवितव्य हे त्या पुरुषाने च खराब केलेले असते.
एका सर्व्हे नुसार तक्रार करणाऱ्या महिलांपैकी 16% महिलांना तक्रारी नंतर अजूनच मानसिक त्रासाला / harrasment ला सामोरे जावे लागते. दोषी कडून अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणे किंवा धमकी देणे इतकेच नव्हे तर अनेकदा त्यांचावर जीवघेणे हल्ले देखील होतात.
अनेकदा याच बाबतीत अनेक चुकीच्या / खोट्या केस देखील दाखल होतात, ते पूर्णपणे चुकीचे आहे पण म्हणून सर्वच केस खोट्या असतील असे नाही. मुळात समज किंवा कुणी काय म्हणेल ह्याचा विचार न करता अश्या वेळी जवळच्या व्यक्ती सोबत मन मोकळे करून लवकरात लवकर तक्रार करणे हाच सर्वात उत्तम पर्याय ठरतो, स्त्री चे चारित्र्य हे तिच्या शरीरात नसून मनात असते हे देखील आपण सर्वांनी समजून घेणे गरजेचे आहे.



