आपल्या जवळची व्यक्ती थोडी दुःखी / upset दिसली की सर्वात आधी आपण त्यांचे दुःख दूर करण्याचा पर्याय त्यांना सांगू लागतो किंवा ते दुःख दूर करायला स्वतः पाऊले उचलतो, आपण एवढी मदत करत असताना देखील समोरची व्यक्ती आपल्याला हवे तसे react करत नाही उलट आपल्यावरच चिडचिड करते. आपल्याला वाटते की ती एवढे कृतघ्न का वागत असेल ? आजच्या लेखात आपण मदत करण्याचा योग्य मार्ग कोणता याविषयी माहिती घेऊ.
आपण जेव्हा समोरच्याला त्याचे दुःख दूर करण्याचा मार्ग सांगत असतो तेव्हा अनेकदा तो प्रयत्न असफल होतो, एखादी व्यक्ती दुःखी असताना तिला अनेकदा एकटे, उदास आणि कन्फ्युज वाटत असते, अशा वेळी तार्किक (लॉजिकल) solution पेक्षा त्यांना समजून घेणारे आणि शांत करणारे कुणीतरी हवे असते.
बरेचदा जेव्हा आपण असे solution देतो तेव्हा त्या व्यक्तीला अधिक वाईट वाटते आणि आपण आपल्या समस्या सोडवायला असमर्थ आहोत असा त्यांच्या समज होऊन त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. कठीण समयी सर्वात जास्त फायद्याचा असलेला आत्मविश्वास कमी झाल्याने ते अधिकच दुःखी होत जातात.
आपण हे कसे करू शकतो हे समजून घेण्यासाठी एकच प्रसंग 2 वेगवेगळ्या response/ प्रतिक्रियांच्या माध्यमातून समजून घेऊ.
प्रतिक्रिया 1 –
अनिकेतच्या ऑफिस मध्ये आज प्रमोशन संदर्भात मीटिंग होती, त्याला प्रमोशन न मिळाल्याने तो फारच दुःखी झाला होता. घरी आल्यानंतर तो उदास होऊन सोफ्यावर बसून शून्यात पाहू लागला सीमा म्हणजेच त्याच्या बायकोने हे पाहिले आणि त्याला उदास असल्याचे कारण विचारले, त्याने थोडी टाळाटाळ केली आणि तिने खूपदा विचारल्यावर प्रमोशन न मिळाल्याचे सांगितले. बायको ने एक क्षण ही वाया न घालवता त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. तू असे का नाही बोललास? तू तसे का नाही बोललास ?
अनिकेत ने उत्तरे देणे टाळले, सीमा अजून चिडली तुला कधी स्वतःसाठी बोलताच येत नाही. ती स्वतःचा लॅपटॉप घेऊन आली आणि अनिकेत च्या बॉसला पाठवण्यासाठी साठी एक ईमेल ड्राफ्ट करू लागली, अनिकेत म्हणाला की तू यात पडू नकोस यामुळे मला जास्त त्रास होऊ शकतो, सीमा ने अनिकेत कडे रागाने पाहिले आणि तुम्हाला माझी काहीच किंमत नाही असे बोलत बेडरुममध्ये निघून गेली, सीमाची कटकट ऐकायला नको म्हणून अनिकेत तिथेच सोफ्यावर झोपी गेला.
प्रतिक्रिया 2 –
अनिकेत ने प्रमोशन न मिळाल्याचे सांगताच सीमा ने त्याला पाणी दिले आणि त्याच्या बाजूला येऊन बसली, तो काय म्हणत आहे हे शांत पणे ऐकू लागली. तुला प्रमोशन न मिळण्याची कारणे कदाचित वेगळी असतील पण प्रमोशन न मिळाल्यावर कसे वाटते हे मला माहीत आहे असे बोलून त्याला आधार दिला.
ती म्हणाली अनिकेत, तू जितका दुःखी आहेस, तितकीच मी देखील झाले असते, तू या प्रमोशन साठी खूप मेहनत घेतली होतीस, त्यामुळे तुला दुःख होणे स्वाभाविक आहे. हे बोलताच अनिकेत तिच्याकडे पाहून म्हणाला की हो मी खरंच खूप दुःखी आहे.
सीमाने त्याला विचारले की तुला नेमके काय फील होत आहे ? अनिकेत म्हणाला की ही माझी शेवटची संधी होती, मी 3 वर्षात रिटायर होणार आहे. मी प्रचंड अपयशी आहे आणि माझे करीअर संपले असे मला वाटत आहे.
हे सर्व ऐकत असताना सीमा म्हणाली की अरे तुला आठवत का की 7वी नंतर तू आणि आपले सर्व मित्र यांना सेमी इंग्लिश मध्ये प्रवेश मिळाला पण मला कमी मार्क असल्याने मी मराठी माध्यमात राहिले, मला वाटलं की माझी प्रगतीच होणार नाही, मी खूप मागे पडेन. त्यामुळे आज तुला काय फील होत आहे हे मी समजू शकते.
सीमाने अनिकेत ला घट्ट मिठी मारली, आणि म्हणाली की या 3 वर्षात तुझ्यासोबत काय काय चांगले होऊ शकते हा विचार कर, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. अनिकेत ने तिला विचारले की आपण माझ्या आवडीचा चित्रपट पाहूया का ? तीने स्मितहास्य करत होकार दिला. अनिकेत देखील शांत झाला आणि तो देखील फ्रेश व्हायला उठला.
आता दुसऱ्या प्रतिक्रियेत सीमा ने अनिकेतला फिक्स करण्याचा प्रयत्न केला का ? नक्कीच नाही, उलट त्याला एकटे कसे वाटणार नाही आणि त्याला आधार कसा देता येईल हा प्रयत्न केला.
नेमके हे सीमा ने कसे केले ?
1. सीमाने अनिकेत ची परिस्थिती आणि तर्क याकडे लक्ष न देता तो काय फील करत आहे याकडे लक्ष दिले.
2. सीमाने आपले सर्व लक्ष अनिकेतकडे ठेवले, आपल्याला काय वाटते, किंवा आपल्यामते त्याने काय करायला हवे हे अजिबात त्याच्यावर थोपले नाही.
3. सीमा कदाचित सारख्या परिस्थिती मधून गेली नसेल पण तिने अनिकेतला नेमके काय फील होत आहे हे समजून स्वतःच्या आयुष्यातील एखादा प्रसंग सांगून त्याला सकारात्मक विचार करायला भाग पाडले.
4. सीमा ने अनिकेतच्या भावनांचा आदर केला आणि त्यांना प्रोत्साहन दिले, त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम केले.
5. अनिकेत ने विचारल्या शिवाय सीमाने त्याला कोणताच सल्ला दिला नाही.
आपला उद्देश चांगला असला तरीही आपण त्यांना fix करण्याचा प्रयत्न न करता नेमके त्यांना काय वाटतं आहे आणि त्यांना काय हवे आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करायला हवा. अशा वेळी आपली सहवेदना (empathy) फारच कामी येऊ शकते. जर आपण त्यांना शांतपणे ऐकून घेऊ शकलो आणि ते एकटे नाहीयेत हे पटवून देऊ शकलो तर त्यांचे दुःख खऱ्या अर्थाने कमी होऊ लागते आणि आपला त्यांना मदत करण्याचा उद्देश पूर्ण होतो.



