अनेक नवीन पालकांना एकच प्रश्न सतावतो — “आपल्या मुलांना शाळेत कधी घालावे?”
मुलं तीन वर्षांची होताच पालकांना वाटते की आता शाळा सुरू करावी. काहीजण विचारतात, “कोणते बोर्ड योग्य?”, “इंग्रजी माध्यम घ्यावे का?”, “लवकर सुरू केल्यास शिकण्यात फायदा होईल का?”
या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सोपी नसतात, कारण प्रत्येक मूल, प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे निर्णय घेताना शारीरिक, बौद्धिक, सामाजिक आणि भावनिक पैलूंचा विचार करणे अत्यावश्यक ठरते.
मुलांना समजून घेताना — वय, मेंदूची वाढ आणि जिज्ञासा
बालकाच्या पहिल्या सहा वर्षांत मेंदूचा विकास सर्वाधिक वेगाने होतो. या काळात मेंदू सुमारे 90% विकसित होतो (UNICEF, 2022).
ही वर्षं म्हणजे मुलांच्या शिकण्याची सुवर्णकालावधी असते.
या काळात:
- मुलं संवेदनांद्वारे जग जाणून घेतात.
- ऐकणे, पाहणे, स्पर्श करणे, वास घेणे आणि चव घेणे — या पाच ज्ञानेंद्रियांची क्षमता तीव्र असते.
- मुले आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने पाहतात आणि ‘अब्जॉर्ब’ करतात.
उदा., आईने जेव्हा रोज एकाच सुरात गाणं गायले, ते ते लक्षात ठेवतात; बागेतल्या किड्याला पाहून ते प्रश्न विचारतात; एकदा पडल्यावर पुन्हा धावणे शिकतात — हे सर्व त्यांच्या जिज्ञासेचे उदाहरण आहे.
या काळात मुलांनी शिकायचं म्हणजे फक्त बोलणं किंवा लिहिणं नव्हे, तर जगण्याचा अनुभव घेणं. त्यामुळे ६ वर्षांपर्यंत शिक्षणाचं उद्दिष्ट जिज्ञासा वाढवणे, निरीक्षण आणि अनुभव देणे असं असावं.
प्री-स्कूल किंवा प्ले-स्कूल — फायदे आणि मर्यादा
आज बहुतेक शहरे आणि गावांमध्ये प्ले-स्कूलची मोठी चळवळ आहे. त्याचे मूळ उद्दिष्ट “मुलांना समवयस्कांशी मिसळायला शिकवणे, सामाजिक वागणूक वाढवणे आणि सुरक्षित खेळाचे वातावरण उपलब्ध करून देणे.” हे आहे. , विशेषतः जेव्हा दोन्ही पालक नोकरीवर असताना मुलांना घरी एकटे ठेवण्याऐवजी एक संरचित, खेळावर आधारित वातावरण देणे योग्य ठरते.
फायदे:
- सामाजिक कौशल्यांचा विकास (वाटून घेणे, गटात खेळणे, संवाद).
- नियम समजणे, शिक्षकांचा आदर करणे.
- शारीरिक हालचाल, गाणी, कला यांमुळे भावनिक स्थैर्य वाढते.
मर्यादा:
- या वयातील मुलांना नियंत्रित करणे नव्हे, तर समजून घेणे आवश्यक असते; अनेक ठिकाणी प्रशिक्षित शिक्षक वर्ग नसल्याने मुलांच्या जिज्ञासेला प्रोत्साहन मिळत नाही.
- वर्गात मुलांची संख्या जास्त असल्यास प्रत्येकावर स्वतंत्र लक्ष देता येत नाही.
- “शांत बस” किंवा “बोलू नको” अशा सूचना मुलांच्या नैसर्गिक उत्सुकतेवर परिणाम करू शकतात.
म्हणूनच पालकांनी शाळा निवडताना शिक्षकांचे प्रशिक्षण, विद्यार्थ्यांचा अनुपात, आणि शिकवण्याची पद्धत याचा बारकाईने विचार करावा.
पालकांनी स्वतःला विचारायचे प्रश्न
एखाद्या मुलाला शाळेत कधी घालायचं यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे — पालक त्याला घरी किती वेळ देऊ शकतात?
पालकांनी स्वतःला खालील प्रश्न विचारावेत:
- आपलं कुटुंब संयुक्त आहे का? मुलाला आजी-आजोबांसोबत वेळ मिळतो का?
- मी मुलाला दररोज वेळ देऊ शकते का?
- तो ६ वर्षांचा होईपर्यंत मी करिअरमध्ये थोडा ब्रेक घेऊ शकतो का?
- आजूबाजूला त्याच्या/ तिच्या वयाची मुलं आहेत का?
- तो/ ती त्यांच्यासोबत खेळू शकतो का?
- जवळ उद्यान आहे का, आणि मी रोज त्याला/ तिला घेऊन जाऊ शकते का?
जर या प्रश्नांची उत्तरे “होय” असतील, तर घरीच मुलाचा विकास घडवणं शक्य आहे.
पण जर वेळ देणे शक्य नसेल, तर शाळा निवडताना पुढील बाबी पाहाव्यात:
- खेळावर आधारित शिक्षण आहे का?
- शिक्षक बालमानसशास्त्र प्रशिक्षित आहेत का?
- मुलांवर अभ्यासाचे दडपण नाही ना?
- दररोजची वेळ, अंतर, आणि प्रवास यांचा ताण तर नाही ना?
घरी शिकवत असताना काय आणि कसे शिकवावे?
मुलांना घरी शिकवताना ‘पुस्तकी’ शिकवणं आवश्यक नाही. त्याऐवजी रोजच्या जगण्यातील अनुभव हा सर्वोत्तम शिक्षणाचा मार्ग आहे.
काय करावे:
- गोष्टी सांगाव्यात, गाणी गायची, चित्रं दाखवायची.
- एकत्र स्वयंपाकात, झाडांना पाणी देण्यात किंवा मातीशी खेळण्यात सहभागी करावे.
- रोजच्या वस्तूंबद्दल चर्चा करावी — रंग, आकार, आवाज.
- खेळ, चित्रकला, नृत्य, बागकाम यांतून सामाजिक शिकणं घडतं.
- मुलांना समवयस्कांसोबत खेळायला संधी द्यावी.
सामाजिक विकास:
मुलं जर सामाजिक झाली नाहीत, तर पुढे शाळेत जाताना भीती, आत्मविश्वासाची कमतरता, आणि ‘सेपरेशन अँक्झायटी’ निर्माण होऊ शकते.
म्हणून खेळ, संवाद आणि भावनिक सुरक्षितता ही घरी शिकवताना सर्वात आवश्यक आहे.
बोर्ड निवडताना विचार
भारतात विविध शिक्षण मंडळं (बोर्ड) उपलब्ध आहेत — स्टेट बोर्ड, CBSE, ICSE, IB, IGCSE.
निर्णय घेताना खालील मुद्दे लक्षात घ्यावेत:
- जर नोकरीत बदलीची शक्यता नसल्यास स्टेट बोर्ड सर्वात योग्य. त्यात स्थानिक भाषा, संस्कृती आणि सामाजिक संदर्भ मिळतो.
- CBSE बोर्ड बदलत्या ठिकाणी राहणाऱ्यांसाठी सोयीचे ठरते, कारण देशभर एकसमान अभ्यासक्रम असतो.
- ICSE आणि IB हे तुलनेने अधिक अकादमिक दडपण असलेले असून शहरी आणि उच्च शुल्क असलेले पर्याय आहेत.
- कोणताही बोर्ड “स्टेटस सिम्बॉल” म्हणून निवडू नयेत.
- शाळेचं स्थान, प्रवासाचा वेळ आणि मुलांच्या थकव्याचा विचार महत्वाचा आहे.
शाळा म्हणजे फक्त शिक्षणाचं ठिकाण नाही — ती वातावरण निर्माण करणारी जागा आहे.
माध्यम निवड — मातृभाषेचे आणि सेमी-इंग्रजीचे महत्त्व
बालमानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्र या दोन्ही क्षेत्रातील संशोधन सांगते की मातृभाषेत शिक्षण घेतल्याने शिकण्याची गती, समज आणि आत्मविश्वास वाढतो.
कारणे:
- विचार प्रक्रिया मातृभाषेत होते, त्यामुळे संकल्पना अधिक सखोल समजतात.
- आत्मविश्वास वाढतो कारण भाषा परिचित असते.
- इंग्रजी शिकणे आवश्यक आहे, पण ती ‘शिकण्याचे माध्यम’ नव्हे तर ‘विषय’ असावा.
अनेक अभ्यासांनुसार (NCERT, UNESCO, 2019), मातृभाषा-आधारित सेमी-इंग्रजी शिक्षणपद्धती सर्वाधिक संतुलित ठरते.
त्यात मुलं संकल्पना आपल्या भाषेत शिकतात आणि हळूहळू इंग्रजीचा वापर वाढवतात.
निर्णय वैयक्तिक — कुटुंबाने चर्चा करावी
मुलांना शाळेत कधी घालावे, कोणते बोर्ड किंवा माध्यम निवडावे — या सर्व गोष्टींचा निर्णय अतिशय वैयक्तिक असतो.
कुटुंबाची परिस्थिती, पालकांची उपलब्धता, मुलाचं स्वभाववैशिष्ट्य, आणि परिसरातील सुविधा या सगळ्यांचा विचार एकत्र करूनच निर्णय घ्यावा.
शेवटी हे लक्षात ठेवावे की शिक्षण म्हणजे स्पर्धा नव्हे, तर जीवन समजण्याची प्रक्रिया आहे. प्रत्येक मुलाचं बालपण एकच वेळा येतं — त्यामुळे ते शिकत असताना “बालपण हरवू नये” हेच सर्वात मोठं यश आहे.
संदर्भ
- National Education Policy (NEP 2020), Government of India.
- UNICEF (2022) – Early Childhood Development Report.
- Piaget, J. (1952). The Origins of Intelligence in Children.
- American Academy of Pediatrics (2023). The Importance of Play in Promoting Healthy Child Development.
- NCERT (2022) – Foundational Stage Curriculum Framework.
- UNESCO (2019). Mother Tongue-Based Multilingual Education Report.
- Sharma, R. (2021). Language and Learning: A Study on Early Education in India.



