मानसिक आरोग्य विषयक वाढत्या समस्या ही एक चिंतनीय बाब आहे, अश्या परिस्थिती मध्ये भावनिक आधाराचे महत्व अनन्यसाधारण ठरते, आत्महत्येचे विचार आणि डिप्रेशन अशा मोठ्या समस्येतून जाणाऱ्या व्यक्तींना non judgemental भावनिक आधारयुक्त करुणामय वातावरण उपलब्ध करून दिले तर ते यशस्वीरीत्या त्यांच्या परिस्थितीवर मात करू शकतात. आजच्या लेखात सुयोग्य भावनिक आधाराचे महत्व आणि त्यासाठी पोषक वातावरण कसे तयार करावे हे समजून घेऊ.
उत्तम श्रोते व्हा
एखादी व्यक्ती जेव्हा आपला त्रास सांगत असेल तेव्हा तिला तिचे काय चूक – बरोबर हे सांगणारा न्यायाधीश नको असतो, उलट त्याच्या भावना प्रामाणिक व शांतपणे ऐकून आणि समजून घेऊन सहानुभूतीपूर्वक वागणारा एक मित्र हवा असतो.
जर कुणी आपल्याजवळ त्यांच्या समस्या मांडत असेल तर आपण पुढील गोष्टींची आवर्जून काळजी घ्यावी.
✒️शांतपणे आणि एकाग्र चित्ताने त्यांचे बोलणे ऐकून घ्यावे
✒️त्यांच्यासोबत चांगला eye contact ठेवावा,
✒️आपल्याला त्यांच्या भावना समजत आहेत असे आपल्या शब्दातून आणि हावभावांतून व्यक्त करावे.
✒️त्यांना मध्येच तोडून उपदेश / मार्ग / solution देण्याचा प्रयत्न करू नये,
✒️शक्यतो मोबाईल वापरणे किंवा दुसरे काही काम करणे टाळावे,
✒️त्यांच्या समस्या तुच्छ आहेत किंवा छोट्या आहेत असे बोलून हेटाळणी करू नये.
अंदाज बांधणे टाळा
एकादी व्यक्ती त्याचे अनुभव सांगत असताना, त्याच्या भावना व्यक्त करत असताना ती असे का वागली असेल ? किंवा तिने हा निर्णय का घेतला असेल ? असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात, अशा वेळी त्या व्यक्तीचा स्वभाव, त्यांचे एकूण वागणे, लोकांकडून त्यांच्यांबद्दल ऐकेलेले प्रसंग, आपल्याला आलेले अनुभव अशा कोणत्याच गोष्टीवरून त्यांच्या संबंधीचे अंदाज बांधणे टाळा, मनात जे प्रश्न येत असतील ते शांतपणे विचारा आणि त्यांना मनमोकळेपणाने उत्तर दे द्या, सर्वच प्रश्नांची उत्तरे लगेच मिळतील असे समजू नका, थोडा धीर धरा. त्यांच्यावर अविश्वास दाखवू नका.
प्रत्येकाचे अनुभव आणि भावना या वेगळ्या असतात, त्यामुळे त्यांना सरसकट लेबल करू नका, निष्पक्ष राहून समोरच्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा.
भावनांचा आदर करा आणि त्यांना validate करा.
एखादी व्यक्ती जेव्हा त्याच्या भावना व्यक्त करत असेल तेव्हा त्यांचा आदर केल्याने विश्वासाचे वातावरण निर्माण होते, त्यांनी सांगितलेले सर्व आपल्याला योग्य किंवा अयोग्य वाटत असले तरीही त्यांच्या भावना या खऱ्या आहेत असे समजून आपण त्या ग्राह्य धराव्यात, आपल्या भावना कुणीतरी ग्राह्य धरत (validate) आहे, त्यांच्या स्वीकार करत आहे हे समजल्यावर व्यक्ती देखील दुसऱ्यांवर विश्वास ठेऊ लागते, त्यामुळे भविष्यात कधी मदत लागली तर ती व्यक्ती निर्धास्त, निसंकोच होऊन मदत मागते आणि दुसऱ्यांना देखील मदत करायचा प्रयत्न करते.
सल्ले आणि मदत
आपल्या सर्वांना मदत करायची इच्छा असते पण मानसिक त्रासात असलेल्या व्यक्तीला सरसकट सल्ला देऊन चालत नाही, उलट त्याने त्यांना अजूनच त्रास होऊ शकतो, आपण कोणतीच गोष्ट स्वतः करू शकत नाही, आपण निरुपयोगी आहोत असा त्यांना गैरसमज होऊ शकतो म्हणून संयम बाळगणे गरजेचे ठरते.
पिडीत व्यक्तीने मन मोकळे केल्यावर त्यांना उपलब्ध पर्याय आणि योग्य सल्ला देणे हे आपले कर्तव्य असते, पण सल्ला देताना सोबत शाब्दिक आधार देणे आणि योग्य शब्दांची निवड करणे देखील तितकेच महत्वाचे असते.
आपण मानसोपचारतज्ज्ञ किंवा समुपदेशक नाही हे समजून घेऊन उगाच आपल्याला योग्य वाटणारे पर्याय सुचवू नयेत, त्यापेक्षा उपलब्ध साहित्य, सेवा, समुपदेशन, संस्था किंवा डॉक्टर यांची भेट घेण्याचा सल्ला द्यावा.
संयम आणि सीमा
समोरील व्यक्ती लगेच सर्व सांगेल ही अपेक्षा ठेवणे अवाजवी आहे, अनेकदा विश्वास बसेपर्यंत संयम ठेऊन रहावे लागते, त्याच बरोबर त्यांची बाजू ऐकून घेताना आपला self respect सोडून देऊ नये, किंवा आपल्याला कसेही वागवायची संधी त्यांना देऊ नये, जिथे ही सीमा ओलांडली जात असेल तिथे समोरच्या व्यक्तीला शांतपणे त्यांचा सीमा (boundaries) समजावून सांगणे गरजेचे असते.
भावनिक आधार देत असताना अनेकदा समोरील व्यक्तीला चुकीचे संकेत जात असतात, असे झाल्याने ती व्यक्ती आपल्याकडे आकर्षित होण्याची शक्यता असते, त्यामुळे पुढे दोघांना त्रास होऊ शकतो. असे होऊ नये म्हणून सुरुवातीपासूनच काही सीमा (boundaries) स्पष्ट असाव्यात.
गोपनीयता
तुम्ही समुपदेशक किंवा डॉक्टर नसलात तरीही एखादी व्यक्ती तुमच्याजवळ व्यक्त होत असेल तर त्याने सांगितलेले किस्से, भावना आणि विचार हे फक्त तुमच्यासाठी असतात, ते तुम्ही कोणत्याही कारणाने इतर कुणासमोर ही मांडणे म्हणजे अलिखित गोपनीयतेच्या कराराचे उल्लंघन असते. असे केल्याने ती व्यक्ती अधिकच त्रासात जाऊ शकते, इतर कुणावरही विश्वास ठेवणे त्यांना अवघड जाऊ शकते.
तुलना टाळा
एखाद्या व्यक्तीने तिच्या समस्या सांगितल्या की लगेच तुझे दुःख तर काहीच नाही रे अमक्याचे असे, तमक्याचे तसे … अशी तुलना अजिबात करू नये, मानसिक आजार हे सगळे फक्त दुर्बल लोकांना होतात, सगळे मनोरुग्ण हे वेडे असतात असे निरर्थक सल्ले देऊ नयेत. त्याच बरोबर अमुक पुस्तक वाच, शिवाजी महाराजाचे चरित्र वाच, ते तुझ्यासारखे भ्याड नव्हते असे रिकामे सल्ले देऊन त्यांना अजून एकटे पाडू नका. अशा तुलना व्यक्तीला आपण निरुपयोगी आहोत आणि आपली काहीच करायची लायकी नाही असा समज करायला भाग पाडतात.
तज्ञांचा सल्ला
समोरच्या व्यक्तीचे प्रॉब्लेम ऐकून घेतले आणि आपल्याला जाणवले की त्याची समस्या थोडी क्लिष्ट आणि किचकट आहे तर लगेच त्यांना तज्ञांचा सल्ला घ्यायला सांगा, मनोरुग्ण असणे नॉर्मल आहे आणि त्यातून पूर्ण बाहेर पडता येते असा विश्वास त्यांना द्या.
आणि वरीलपैकी कोणतीही गोष्ट शक्य नसेल तर किमान त्यांना चुकीचे सल्ले देऊन, त्यांची हेटाळणी करून त्यांना निराशावादी बनवू नका. मानसिक आजार हे शारीरिक आजारानंप्रमाणेच नॉर्मल आहेत, आपण सर्वांनी एकत्र येऊन एका सुदृढ समाजासाठी प्रयत्न करणे हे आपले परम कर्तव्य आहे.




2 thoughts on “सुदृढ मानसिक आरोग्यासाठी पोषक वातावरण निर्मिती”
It’s very helpful and it’s became an good bag of information that help me . I always tries to follow and work as per your suggestion.
All the best ! Share with your friends and family and help them too !