धकाधकीच्या जीवनात मनःशांती हे एक स्वप्न वाटू लागले आहे, अव्याहत अशा गोंधळात आपण मनःशांतीसाठी आसुसलेले असतो पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आंतरिक शांततेचा एक शाश्वत स्रोत अगदी आपल्या जवळ आहे, आणि तो म्हणजे निसर्ग ! निसर्गाचा आपल्या मानसिकतेवर होणारा सकारात्मक परिणाम आणि त्याची उपचारक्षमता ज्याला सामान्य भाषेत “निसर्ग चिकित्सा” किंवा “ecotherapy” असे संबोधले जाते, याच निसर्गाचा आपल्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो आणि त्याचा वापर करून आंतरिक शांती कशी प्राप्त करावी हे आपण आजच्या लेखात समजून घेऊ.
निसर्गाची उपचार क्षमता
आपले मन आणि शरीर शांत करण्याची एक अद्वितीय क्षमता निसर्गात आहे, वाऱ्यामुळे झाडांच्या पानांचा येणारा आवाज, तलावाच्या किंवा समुद्राच्या किनारी येणाऱ्या मंद लहरींचा आवाज, बागेत मारलेली एखादी चक्कर किंवा पक्ष्यांची किलबिल फक्त कानी पडली तरीही आपले मन शांत होत असल्याचा अनुभव आपल्यापैकी अनेक लोकांनी नक्कीच घेतला असेल, याच निसर्गाचा आपल्या नेमका मनावर कसा परिणाम होतो ते समजून घेऊ.
🏞️ तणाव कमी होतो
आपले दैनंदिन जीवन खूपच दगदगीचे झाले आहे, त्यामुळे आपण सतत तणावात आणि विचारात असतो पण निसर्गात गेल्या नंतर तेथील नयनरम्य दृश्य, येणारे सुमधुर आवाज आणि गंध यामुळे आपले स्ट्रेस हार्मोनचे प्रमाण कमी होऊ लागते, परिणामी आपण तणावरहित होऊन आपले मन शांत होते.
जे लोक निसर्गाच्या सानिध्यात राहतात त्यांचे cortisol या स्ट्रेस हार्मोनचे प्रणाम इतरांच्या तुलनेत कमी असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे.
🏞️ Mindfulness
निसर्गात फिरताना आपण आपोआप वर्तमानात स्थिरावतो, पुढे काय होईल किंवा उद्या काय काम आहे असे विचार आपल्याला कमी प्रमाणात सतावतात.
उदा. आपल्या समोर असणारे सुंदर दृश्य किंवा नयनरम्य असा सूर्यास्त पाहताना आपोआप आपले सर्व लक्ष तिथे राहते आणि आपण वर्तमानात रमतो.
म्हणजेच निसर्गात दिलेला वेळ हा अगदी ध्यान केल्या सारखाच असतो, त्यामुळे आपल्याला आपल्या वर्तमानात अवतीभोवती होणाऱ्या गोष्टींवर छान लक्ष देता येते आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेता येतो.
🏞️ भावनिक समतोल
निसर्गात वेळ घालवल्याने तणाव (स्ट्रेस), नैराश्य (डिप्रेशन) आणि अती चिंता (anxiety) ची लक्षणे आणि तीव्रता कमी होते असे काही प्रयोगांतून सिद्ध झाले आहे, ताजी हवा, मुबलक सूर्यप्रकाश आणि प्रसन्न वातावरण यामुळे आपल्या मेंदूत रासायनिक समतोल राखला जातो त्यामुळे सकारात्मक विचारांचे प्रमाण वाढते आणि आपल्या भावना देखील संतुलित होतात.
आपल्याकडून कोणतेही अपेक्षा न ठेवता आपल्याला सर्वकाही देणारा निसर्ग हा नकळत कृतज्ञतेची भावना देखील आपल्याला शिकवतो त्यामुळे देखील आपली भावनिक उन्नती होते.
🏞️ शारीरिक आरोग्य
ट्रेकिंग, सायकल प्रवास, बाईक प्रवास किंवा फक्त चालणे अशा अनेक क्रियांमुळे आपले शारीरिक आरोग्य देखील चांगले राहते, योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश आणि ताजी हवा यामुळे आपली झोप आणि मुड देखील चांगला राहतो.
🏞️ एकात्मतेची भावना
निसर्गातील विविध गोष्टी आणि त्यांचे एकमेकांवर होणारे परिणाम आपण जवळून पाहिल्याने सर्व काही एकमेकांशी कसे निगडित आहे हे आपल्याला लक्षात येऊ लागते. एक पूरक व्यवस्था समजल्याने आपण एक समाज म्हणून देखील एमेकांवर कसे अवलंबून आहोत आणि आपला एकमेकांवर कसा परिणाम होतो हे आपल्याला समजते. परिणामी एकात्मतेची भावना वाढीस लागते.
🏞️ सृजनशीलता वाढते
अनेक लेखक, कवी, चित्रकार यांच्या लेखनाचा पाया निसर्गात असतो, विविधता आणि प्रत्येकवेळी नाविण्याने आपल्याला आश्चर्यचकित करणाऱ्या निसर्गामुळे काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा आपल्याला मिळते. आपले अस्तित्व आणि जीवितकार्य यांचा शोध देखील निसर्गामध्ये सहज लागतो यामुळेच अनेक साधू, मुनी, ऋषी हे जंगलात झाडाखाली बसून तप करत असत.
अनेक शोध हे कुतुहलामुळेच लागले आहेत, निसर्गातील अनेक घटना आणि त्यांची उत्तरे शोधण्याची वृत्ती यामुळेच आपल्यातील सृजनशीलता (creativity ) वाढीस लागते. माझ्या अनेक सत्रात सृजनशीलता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी मी रात्री अवकाश निरीक्षण करणे – चंद्र, तारे, तारका मंडळ पाहणे सुचवतो.
🏞️ प्रतिकारशक्ती वाढते
निसर्गात अनेकदा वणवा किंवा अशा घटनांमुळे नुकसान होते पण निसर्ग हार न मानता ते भरून काढतो, अनेक मोठी झाडे पाडतात आणि पुन्हा ती तग धरतात यामुळे आपण देखील प्रतिकूल परिस्थितीवर सहज मात करू शकतो हा विचार आपल्या मनात येतो, एकूणच आपली प्रतिकारशक्ती वाढते.
आंतरिक शांती साठी निसर्गाचा दैनंदिन जीवनात वापर करायचे सोपे मार्ग.
🌿 निसर्गात फेरफटका मारणे – सकाळी किंवा संध्याकाळी निसर्गात फिरायला जा, घराजवळ असलेल्या उद्यानात देखील तुम्ही जाऊ शकता.
🌿 बागकाम (gardening) – आपल्या घरात छान झाडे लावा त्यांची निगा राखा.
🌿 ध्यान – बागेत किंवा जवळील टेकडीवर ध्यानाला बसा.
🌿 जंगल सफारी – आपल्या जवळच्या भागात एखादे जंगल किंवा झाडे असलेल्या ठिकाणी फिरायला जा, तेथील झाडे, पाने, फुले यांचे निरीक्षण करा. तुम्ही बोटानिकल गार्डन मध्ये देखील जाऊ शकता.
🌿 सहल – आपल्या परिवार आणि मित्रमंडळी यांना घेऊन निसर्गात सहलीला जा, तेथे निवांत फिरून निरीक्षण करा.
🌿 व्यायाम – बागेत जाऊन व्यायाम करा, त्यामुळे ताजी हवा आणि सूर्यप्रकाश (सकाळी) मिळेल आणि मुड चांगला राहील.
🌿 चंद्र आणि तारे पहा – रात्रीच्या वेळी चंद्र – त्याच्या कला आणि वेगवेगळे तारे, तारका मंडळ पहा.
🌿 निसर्ग ध्वनी – काम करताना किंवा छोट्या ब्रेक मध्ये विविध निसर्ग ध्वनी – पाण्याचा आवाज, पक्षांचा किलबिलाट असे आवाज ऐका, शक्य असेल तर डोळे बंद करून imagine करा की तुम्ही निसर्गात आहात.
🌿 दुर्गकिल्ले भ्रमंती – महिन्यातून एकदा वेगवेगळ्या किल्ल्यांवर जा, तेथील जैवविविधता पहा.
🌿 पर्यटन स्थळांना भेट – वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेट द्या आणि तिथे असलेल्या गोष्टी समजून घ्या.
🌿 संग्रह करणे – निसर्गातील वेगवेगळ्या वस्तू – पाने, दगड, रंगीत माती, वाळू, शंख, शिंपले अशा गोष्टींचा संग्रह करा.
🌿 चित्रकला – निसर्ग चित्र काढा.
🌿 फोटोग्राफी – निसर्गात जाऊन विविध गोष्टीचे फोटो काढा आणि त्यांचे अल्बम ठेवा.
🌿 प्रवासवर्णने – एखाद्या ठिकाणी जाऊन आल्यानंतर तेथील तुम्हाला आवडलेल्या गोष्टी लिहून काढा आणि ते वाचा.
निसर्ग चिकित्सा आपल्या दैनंदिन जीवनात अगदी सहज करता येते, आणि तिचे परिणाम अगदी सहज दिसू लागतात. तसेच ही शाश्वत असल्याने आपण तिचा आनंद आजन्म घेऊ शकतो. फक्त आपल्यामुळे निसर्गाला हानी पोचणार नाही याची काळजी आपण नक्की घ्यायला हवी.




1 thought on “निसर्ग चिकित्सा – मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून”
मस्त