“उथळ पाण्याला खळखळाट फार” ही म्हण एखाद्या व्यक्तीवर टीका करण्यासाठी नसून, मानवी समज कशी विकसित होत जाते याचे सूक्ष्म निरीक्षण दर्शनवनारी आहे. थोडी माहिती मिळाल्यावर व्यक्तीचा आत्मविश्वास अचानक वाढतो, आणि जशी समज खोल होत जाते, तशी भाषा संयमी व शांत होत जाते. आधुनिक मानसशास्त्र याच अनुभवाकडे शिकण्याच्या प्रवासातील एका विशिष्ट टप्प्याप्रमाणे पाहते.
माउंट स्टुपिड म्हणजे नेमके काय?
माउंट स्टुपिड ही शिकण्याच्या प्रवासातील एक अवस्था (stage) आहे. या अवस्थेत एखाद्या विषयाची सुरुवातीची ओळख झाल्यानंतर आत्मविश्वास वेगाने वाढतो. मिळालेले ज्ञान सोपे आणि परिपूर्ण असल्यासारखे वाटते. त्यामुळे व्यक्तीला आपण विषय समजून घेतला आहे, असा ठाम विश्वास वाटू लागतो.
येथे महत्त्वाचे लक्षात ठेवायला हवे की, ही अवस्था अज्ञानामुळे निर्माण होत नाही; ती आपल्याकडे असलेले ज्ञान अपूर्ण आहे ही जाणीव नसल्यामुळे तयार होते. म्हणूनच माउंट स्टुपिड हे लेबल नसून, शिकण्याच्या प्रवासातील एक टप्पा आहे जो बहुतांश लोक अनुभवतात.
ही संकल्पना कशी मांडली गेली?
या अवस्थेचे शास्त्रीय स्पष्टीकरण डनिंग–क्रुगर प्रभाव या संशोधनातून मिळते. १९९९ साली मानसशास्त्रज्ञ David Dunning आणि Justin Kruger यांनी केलेल्या अभ्यासात असे दिसून आले की, कमी अनुभव किंवा कौशल्य असलेली व्यक्ती स्वतःच्या क्षमतेचे अतिमूल्यांकन करते, तर अनुभव वाढत गेल्यावर आत्मविश्वास अधिक वास्तववादी होत जातो.
या अवस्थेत व्यक्तीचे वर्तन कसे दिसते?
माउंट स्टुपिड अवस्थेतील व्यक्तीचे वर्तन अनेकदा ओळखीचे वाटते. ती स्वतःचे मत ठामपणे मांडते, पण इतरांचे अनुभव किंवा वेगळी मते स्वीकारण्यास तयार नसते. अशा व्यक्तींना प्रश्न विचारले गेले की त्यांना ते मार्गदर्शक न वाटता आव्हान वाटतात. त्यांच्यासोबत केलेली कोणतीही चर्चा शिकण्यासाठी किंवा विकासासाठी न राहता, स्वतःला बरोबर सिद्ध करण्यासाठी वापरली जाते. मात्र हे वर्तन जाणूनबुजून नसते; ती व्यक्ती फक्त शिकण्याच्या एका सुरुवातीच्या टप्प्यावर असते.
जाणकार व्यक्ती कशी वेगळी असते?
जाणकार व्यक्तीचे वर्तन याच्या उलट दिसते. ती “मला सगळं माहीत आहे” असे म्हणण्याऐवजी “मला अजून शिकायचे आहे” हे सहज मान्य करते. प्रश्न विचारले गेले की ती अस्वस्थ होत नाही. तिचा आत्मविश्वास मोठा असतो, पण गोंगाट करणारा नसतो. ती बोलण्यापेक्षा ऐकण्याला आणि ठाम निष्कर्षांपेक्षा समजून घेण्याला प्राधान्य देते. ज्ञान वाढत गेले की नम्रता आपोआप येते.
हा प्रवास पुढे कसा जातो?
शिकण्याचा प्रवास एका वक्ररेषेत (curve) समजावता येतो.

सुरुवातीला थोडेसे ज्ञान मिळाल्यावर आत्मविश्वास शिखरावर पोहोचतो ही अवस्था माउंट स्टुपिड म्हणून ओळखली जाते. पुढे जसजसे विषयाचे खोल स्वरूप समजू लागते, तसतसे प्रश्न वाढतात आणि आत्मविश्वास कमी होतो. हा टप्पा मानसिकदृष्ट्या कठीण असतो, कारण येथे स्वतःच्या मर्यादा स्पष्ट दिसू लागतात या अवस्थेला निराशेची दरी/ valley of despair म्हणतात. इथे अनेक व्यक्ती हार मानून थांबतात.
मात्र जी व्यक्ती इथे थांबत नाही, ती अनुभव, अभ्यास आणि चिंतन यांच्या साहाय्याने पुढे जाते. या प्रवासात बहु आयामी अभ्यासामुळे तीचा आत्मविश्वास हळूहळू उंचावू लागतो या प्रगतीच्या अवस्थेला slope of enlightenmen असे म्हणतात, यातून वाढलेला आत्मविश्वास हा शांत, स्थिर आणि वास्तववादी असतो. शिकणे ही प्रक्रिया कधीच पूर्ण होत नाही, ही जाणीव येथे दृढ होते हीच अवस्था शिकण्याची सर्वोच्च अवस्था समजली जाते.
उथळ पाण्याचा खळखळाट हा शिकण्याच्या सुरुवातीचा आवाज असतो.
तर खोल पाण्याची शांतता ही समज प्रगल्भ झाल्याची खूण असते.
संदर्भ (References)
- Dunning, D., & Kruger, J. (1999). Unskilled and unaware of it: How difficulties in recognizing one’s own incompetence lead to inflated self-assessments. Journal of Personality and Social Psychology.
- Kruger, J., & Dunning, D. (1999). Empirical findings on self-assessment and cognitive bias.
- Kahneman, D. (2011). Thinking, Fast and Slow. Farrar, Straus and Giroux.
- Psychological Science in the Public Interest – Cognitive bias and self-evaluation studies.



