मुलांसोबत काम करत असताना ममता ताई अनेकदा म्हणतात की — “एक चूक म्हणजे तो मुलगा नाही.”
अलीकडे “कौन बनेगा करोडपती ” (KBC) मध्ये एका मुलाने भाग घेतला. तो मुलगा अतिशय बोलका, आत्मविश्वासपूर्ण पण उद्धट आणि उतावळा वाटत होता. त्याने मोठ्या ऊर्जेनं उत्तरं दिली, अनेकदा तो मधेच बोलला, त्याने नियम ऐकून घेतले नाहीत, तर कधी त्याचा सूर थोडा तीव्र झाला. काहींना ते उद्धट वाटलं. शेवटी तो शून्य रुपयांवर पराभूत झाला. पण कार्यक्रम संपण्याआधीच, सोशल मीडियावर त्या मुलावर मीम्स, टीका आणि विश्लेषणांचा पूर आला.
काहींनी त्याला “अहंकारी”, “असंवेदनशील”, “अशिक्षित” अशा लेबलांनी झाकून टाकलं., पण अनेकांनी “त्याला ADHD आहे” अशा प्रकारचे निष्कर्ष काढले. या संदर्भात एक मानसशास्त्र अभ्यासक म्हणून माझे विश्लेषण या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
एक एपिसोड म्हणजे संपूर्ण निदान नाही.
ADHD — म्हणजे Attention Deficit Hyperactivity Disorder — हा एक न्यूरो-डेव्हलपमेंटल विकार आहे, जो एखाद्या मुलाच्या लक्ष, एकाग्रता, आणि नियंत्रण क्षमतेवर परिणाम करतो.
पण, मानसशास्त्रात ADHDचं निदान हे काही एका कार्यक्रमातील वर्तनावरून होत नाही.
ADHD ओळखण्यासाठी आवश्यक असतं —
- दीर्घकाळ (किमान ६ महिने) आढळणारी लक्षणे,
- दोन किंवा अधिक ठिकाणी (घर, शाळा, सामाजिक व्यवहार) वर्तणूकीत दिसणारी अडचण,
- शैक्षणिक किंवा सामाजिक कार्यक्षमतेवर परिणाम.
त्या मुलाच्या चेहऱ्यावरून मीम्स, विनोद, आणि ‘reel reactions’ बनले. अनेकांनी “हा संस्कारहीन आहे”, “याला ADHD आहे” असं म्हणून आपला निर्णय दिला.
पण हे लक्षात घ्यायला हवं की आपण एखाद्या मुलावर सार्वजनिक लेबल लावतो आहोत.
बालवर्तनाचं मानसशास्त्र: एका क्षणाचं वर्तन, आयुष्यभराची ओळख नाही
लहान मुलं ही विकासाच्या या टप्प्यात त्यांच्या भावनांचं व्यवस्थापन शिकत असतात. टीव्हीवरील मोठी स्पर्धा म्हणजे त्यांच्या दृष्टीने एक मोठे व्यासपीठ असते जिथे मिळणारी प्रसिद्धी, लख्ख दिवे, प्रकाशझोत, प्रेक्षकांचा आवाज, साऊंड इफेक्ट आणि सूत्रसंचालक रूपात प्रसिद्ध व्यक्तिमत्व समोर असणे या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी भावनिकदृष्ट्या भारावून टाकणाऱ्या असतात.
त्या क्षणी दिसणारा उतावळेपणा किंवा आक्रमकपणा हा बहुतेकदा अतिउत्साह, घाबरटपणा, किंवा स्वतःला सिद्ध करण्याची घाई या भावनांमधून निर्माण होतो.
तो उद्धटपणा नसून, अवघड भावनेचं अपरिपक्व प्रदर्शन असण्याची शक्यता जास्त असते.
वर्तनाच्या मुळाशी असलेली मानसिक प्रक्रिया
आपण या वर्तनाकडे खालील काही दृष्टिकोनातून पाहू शकतो:
- अतिउत्तेजना (Overstimulation):
स्टुडिओमधील वातावरण, दिवे, कॅमेरे, आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या समोर बसल्याचा ताण — हे सगळं मुलाच्या मेंदूला अतिउत्तेजित करतं.
परिणामी तो पटकन बोलतो, थांबत नाही, आणि आपल्या उत्साहावर नियंत्रण ठेवू शकत नाही. - स्वत:ला सिद्ध करण्याची गरज:
अनेक मुलं “मीही काहीतरी करून दाखवेन” या भावनेने भारलेली असतात.
तेव्हा जेव्हा त्यांना थांबवलं जातं किंवा दुरुस्त केलं जातं, ते वैयक्तिक नकार म्हणून घेतात — हीच ती जागा जिथे भावनांचं नियंत्रण सुटतं. - भावनिक परिपक्वतेचा टप्पा:
मुलांचं prefrontal cortex — म्हणजे निर्णयक्षमता आणि नियंत्रण देणारा भाग — अजून विकसित होत असतो.
म्हणून त्यांच्या वर्तनात उतावळेपणा (impulsivity) नैसर्गिक असतो.
याला आजच्या भाषेत “ADHD traits” म्हणून काही लोक ओळखतात, पण हे विकासात्मक वैशिष्ट्य आहे, आजार नाही.
अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया
या प्रसंगात अमिताभ बच्चन यांनी दाखवलेली शांतता आणि संयम हे प्रत्येक पालक आणि शिक्षकासाठी आदर्श आहेत.
त्यांनी त्या मुलाला अपमानित न करता, संवाद साधत त्याच्या भावनांना जागा दिली.
याला मानसशास्त्रात co-regulation म्हणतात — जेव्हा एक प्रौढ स्वतःचं शांत मन वापरून मुलाच्या अस्थिर भावनांना स्थिर करतो.
या एका क्षणातून आपल्याला दिसतं की संयम शिकवणं तितकंच महत्त्वाचं आहे, जितकं ज्ञान देणं.
समाजाची प्रतिक्रिया
सोशल मीडियावर या प्रसंगावरून मीम्स, टीका, आणि विनोदांची लाट आली, अनेकांनी याला ADHD या मानसिक आजाराचा लेबल दिला तर काहींनी चक्क हे वाहिनीने प्रसिद्धीसाठी वापरलेले तंत्र असल्याचे आरोप केले.
परंतु या सर्व उहापोहात हे विसरलं गेलं की तो एक लहान मुलगा आहे, त्याचे हे शिकण्याचे, समजण्याचे आणि घडण्याचे वय आहे.
एका क्षणाचं वर्तन म्हणजे त्याचा पूर्ण स्वभाव नाही.
आपण त्या मुलाच्या चेहऱ्यावर मीम्स बनवून, त्याचा व्हिडिओ शेअर करून, ‘reel reactions’ द्वारे नकळत त्याच्या आत्मसन्मानावर आघात करत आहोत, त्या मुलाला, त्याच्या कुटुंबाला, आणि भविष्यातील त्याच्या भावनांना हे कायमचं ओझं ठरू शकतं.
ADHD किंवा कोणतीही मानसिक स्थिती ही निदान, निरीक्षण आणि काळजीपूर्वक मूल्यमापनानं समजून घ्यायची असते, ती सोशल मीडियावरच्या तर्कांमधून ठरवायची नसते.
पालक आणि समाजासाठी काही प्रश्न
- माझं मूल हरलं, चुकलं, किंवा चुकीचं बोललं — तर मी त्याला समजावतो की लाजवतो?
- आपण मुलांच्या भावनांना समजून घेण्यासाठी किती वेळ देतो?
- मी स्वतः माझ्या भावनांचं नियमन दाखवतो का, की फक्त सांगतो?
- आपण त्यांचं ऐकतो की फक्त त्यांचं मूल्यांकन करतो?
- मुलं उतावळी वागली, बोलकी झाली तर आपण ती उर्जा कशी योग्य मार्गाने वापरतो?
- आपण त्यांच्या भावनांवर संवाद करतो का, की फक्त शिस्तीवर भर देतो?
- मुलं हरली की आपण त्यांच्यावर दबाव आणतो का, की त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक करतो?
- आणि सर्वात महत्त्वाचं — आपण सोशल मीडियावर मुलांच्या चुका ‘मनोरंजन’ म्हणून पाहतो का?
संवेदनशील आवाहन
“आपण अशा व्हिडिओंना व्हायरल करताना विसरतो की त्या मुलाचं मन अजूनही वाढीच्या टप्प्यात आहे.
एका क्षणाचं वर्तन त्याच्या व्यक्तिमत्त्वाचं प्रतिनिधित्व करत नाही.
म्हणून अशा व्हिडिओंना शेअर करणं, मीम बनवणं किंवा मुलाचा चेहरा दाखवणं थांबवलं पाहिजे — कारण आपण नकळत त्या मुलाच्या आत्मसन्मानावर आघात करतो.”
प्रत्येक मुलाला स्वतःकडे नव्या नजरेनं पाहण्याची, शिकण्याची संधी मिळायला हवी — ती संधी आपण समाज म्हणून हिरावून घेऊ नये.
“एक चूक म्हणजे तो मुलगा नाही” — ही शिदोरी आज आपल्या सर्वांसाठी आहे.




1 thought on “KBC मधील बाल स्पर्धकाचे मनोविश्लेषण”
खर आहे व गरजेची बाब सुधा