पाऊस, ऊन आणि अस्वस्थता : हवामान बदलाचा मानसिक आरोग्यावर परिणाम

Table of Contents

पुणे आणि महाराष्ट्रात यंदा आपण एक विचित्र ऋतू अनुभवत आहोत —दुपारी उकाडा, दुपारनंतर जोरदार पाऊस आणि संध्याकाळी गारवा! एकाच दिवशी तीन ऋतूंचा अनुभव — ऊन, पाऊस आणि थंडी — जणू निसर्गाने स्वतःचे नियम बदलले आहेत. पण या बदलाचा परिणाम केवळ शेतीवर, पायाभूत सुविधांवर किंवा वाहतुकीवर होत नाही; तो आपल्या मनावर देखील खोल परिणाम करतो.

हवामान बदल — बाह्य आणि अंतर्गत

अनेकांना वाटते हवामानातील बदल म्हणजे फक्त तापमान, पाऊस किंवा प्रदूषण यातील फरक. परंतु मानसशास्त्र सांगते की, हवामान आणि मन यांचा घनिष्ठ संबंध आहे. आपल्या शरीरातील जैविक घड्याळ (Biological Clock) तापमान, प्रकाश आणि आर्द्रतेवर अवलंबून असते. जेव्हा हे घटक रोज बदलतात, तेव्हा आपल्या मनोभावना, झोप, एकाग्रता आणि ऊर्जा यावर त्याचा थेट परिणाम होतो.

अलीकडच्या दिवसांत सकाळी आर्द्रता आणि घाम, दुपारी तीव्र ऊन आणि उकाडा तर संध्याकाळी अचानक आलेला पाऊस व थंड वारा असे वातावरण आपण अनुभवत आहोत. हा सतत बदलणारा वातावरणीय अनुभव आपल्या मेंदूला “स्थिरता” मिळू देत नाही. अशा परिस्थितीत शरीराला तापमानाशी जुळवून घ्यावे लागते, आणि मेंदूला सतत अलर्ट मोडमध्ये राहावे लागते. त्यामुळे आपल्याला अस्वस्थता, चिडचिड, थकवा आणि एकाग्रतेचा अभाव अशी लक्षणे जाणवतात.

संशोधन सांगते की एक दिवसात तापमानात ५–१० अंश इतका फरक झाला तर मूड स्विंग्स, अस्वस्थता आणि चिडचिडेपणा वाढतो (The Lancet Planetary Health, 2021).

पाऊस आणि मन

भारतीय संस्कृतीत पावसाला भावनिक अर्थ आहे या ऋतुचा संबंध प्रेम, कविता आणि आनंदाशी जोडला जातो, पण सततचा, अनिश्चित आणि अवेळी पडणारा पाऊस मात्र मनावर ताण आणतो. घरातच अडकून राहणे, सूर्यप्रकाशाचा अभाव, सतत आर्द्र वातावरण यामुळे सेरोटोनिन नावाच्या “मूड नियंत्रक” रसायनाचे प्रमाण कमी होते.

कमी सेरोटोनिन मुळे अधिक थकवा, उदासीनता, आणि कधी कधी “seasonal depression” ची लक्षणे. ह्यालाच मानसशास्त्रात “सीझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर (SAD)” म्हणतात.

भारतीय संशोधनानुसार, पावसाळ्यात लोक अधिक झोपाळलेले, उदास व निष्क्रिय वाटतात. विशेषतः जे आधीपासूनच तणावग्रस्त किंवा चिंताग्रस्त असतात.

उकाडा आणि चिडचिड — “हिट स्ट्रेस”चा मनावर परिणाम

ज्या दिवशी तापमान जास्त असते, त्या दिवशी रस्त्यावर भांडणे, ताण आणि अपघात यांचे प्रमाण वाढते,असे Lancet (2020) च्या अभ्यासात दिसून आले आहे. याला “Heat-related Aggression” म्हणतात.

उकाड्यामुळे:

परिणामी आपण अतिसंवेदनशील, चिडखोर आणि निर्णय घेण्यात अस्थिर होतो. अशा हवामानात कामकाज किंवा शिक्षणात एकाग्रता कमी होते, ही अनेक शाळा व ऑफिसमधील निरीक्षणे आहेत.

संध्याकाळचा गारवा — आराम की अस्थिरता?

अनेकांना वाटते थंडावा म्हणजे आराम, पण दिवसभरात हवामानातील तीव्र बदल (heat → humidity → cool breeze) मेंदूच्या तापमान नियमन प्रणालीला गोंधळवतो. शरीर दिवसअखेर थकलेले वाटते, आणि झोपण्यापूर्वीही “मन शांत होत नाही” अशी तक्रार अनेकांना असते.

या अवस्थेला मानसशास्त्रात emotional fatigue म्हणतात ज्यात शरीर थकलेले असते पण मन अजूनही सतर्क असते.

हवामान बदल आणि ‘Climate Anxiety’

आजची पिढी हवामान बदलाचा प्रभाव फक्त अनुभवत नाही, तर त्याबद्दल भयभीत देखील आहे. पृथ्वी गरम होत आहे, पावसाचे पॅटर्न बदलत आहेत, पर्यावरण अस्थिर आहे या सगळ्यामुळे अनेक तरुणांमध्ये “Climate Anxiety” दिसते.

Lancet (2022) च्या अहवालानुसार भारतातील ६७% युवकांना “भविष्यातील हवामानाबद्दल चिंता आणि असुरक्षितता” वाटते. सततचे हवामानातील बदल या भावनेला अधिक तीव्र करतात.

अशा वेळी “माझं मन एवढं बेचैन का आहे?” हा प्रश्न अनेकांना पडतो — उत्तर साधं आहे : आपण निसर्गाशी एकत्र जोडलेलो आहोत, आणि जेव्हा निसर्ग अस्थिर होतो, तेव्हा मनही अस्थिर होतं.

मानसिक आरोग्यावर होणारे संभाव्य परिणाम आणि त्याची कारणे

  • झोपेचा त्रास : तापमान व आर्द्रतेतील बदल
  • थकवा, प्रेरणाशक्ती कमी होणे : शरीर-मन असंतुलन
  • चिडचिड, असहिष्णुता : उकाडा, घाम, झोपेचा अभाव
  • एकाग्रता कमी : सततचे हवामान बदल व अस्थिरता
  • निराशा, उदासीनता : कमी सूर्यप्रकाश, बाहेर जाण्यात अडथळे

मनाचा समतोल टिकवण्यासाठी काही मानसशास्त्रीय उपाय

  • स्थिर दिनक्रम ठेवा : हवामान काहीही असले तरी झोप, आहार, आणि कामाचे वेळापत्रक स्थिर ठेवा. हे जैविक घड्याळाला स्थैर्य देते.
  • नैसर्गिक प्रकाशात वेळ घालवा : सकाळी काही वेळ सूर्यप्रकाशात चालणे, बाल्कनीत बसणे सेरोटोनिन वाढवते आणि मन प्रसन्न ठेवते.
  • हायड्रेशन आणि शारीरिक हालचाल : गरम किंवा ओलसर हवामानात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पाणी, फळांचे रस, व हलका आहार घ्या. दररोज १५-२० मिनिटे चालणे किंवा स्ट्रेचिंग असे व्यायाम मनाला स्थैर्य देण्याचे काम करतात.
  • माइंडफुलनेस आणि श्वसनव्यायाम: हवामानाच्या बदलामुळे निर्माण झालेल्या अस्वस्थतेवर ‘दीर्घ श्वासोच्छ्वास’ आणि ‘ग्राऊंडिंग’ व्यायाम परिणामकारक ठरतात. मनाला सांगणे – “हा बदल तात्पुरता आहे” ही स्वीकृतीच मानसिक स्थैर्य देते.
  • डिजिटल ब्रेक घ्या :  हवामान बदलाशी संबंधित भीती वाढवणाऱ्या बातम्या किंवा सोशल मीडिया पोस्टपासून थोडा ब्रेक घ्या. त्याऐवजी स्थानिक पातळीवर काही सकारात्मक उपक्रम करा — उदाहरणार्थ वृक्षारोपण, पाण्याची बचत, पर्यावरण जनजागृती.
  • संवाद ठेवा : अस्वस्थ वाटत असल्यास आपल्या मित्र, कुटुंबीय किंवा काउन्सेलरशी संवाद साधा. मनातील भावना दडपून ठेवणे तणाव वाढवते.

निष्कर्ष : निसर्ग बदलत आहे, आपणही जुळवून घेऊ या

हवामान बदल हा केवळ पर्यावरणीय प्रश्न नाही, तो मानसिक आरोग्याचा प्रश्न सुद्धा आहे. पाऊस, ऊन आणि गारवा यांचा अस्थिर चक्रव्यूह आपल्या मनाच्या लयीला विस्कळीत करतो, पण जागरूकता, शारीरिक काळजी आणि भावनिक स्वीकृतीने आपण तो समतोल राखू शकतो.

आपण निसर्गाचा एक भाग आहोत म्हणून निसर्गातील बदलांशी लढा देण्यापेक्षा त्याच्याशी ताल जुळवणे हाच मानसिक आरोग्याचा नवा मंत्र आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Read also

लोकशाही, मानसिक आरोग्य आणि मतदान

उद्या म्हणजेच 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुका होत आहेत. मूलभूत सुविधा, शहराचा विकास, सार्वजनिक व्यवस्था, शिक्षण आणि सुरक्षितता या सर्व निर्णयांचे केंद्रबिंदू नगरपालिका असते.

Read More »
स्वातंत्र्य म्हणजे मर्यादांचा अभाव नव्हे

लक्ष्मणाने सीतेसाठी आखलेली रेषा ही बंधन नव्हती, तर सुरक्षिततेसाठीची एक स्पष्ट सीमा होती. त्या रेषेचा उद्देश सीतेला रोखणे नसून तिला वाचवणे हा होता. रावणाने संरक्षक

Read More »
Scroll to Top

Get updates on whatsapp

"*" indicates required fields

Name*
Receive Updates about*