तुम्हाला माहीत आहे का की शारीरिक आणि मानसिक आरोग्य यांचा एकमेकांशी घनिष्ट संबंध आहे, आरोग्यविषयक अभ्यासकांनी अनेक संशोधनातून आणि अभ्यासातून शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे परस्पर संबंध शोधून काढले आहेत, आपले विचार, भावना आणि मानसिक स्थिती यांचा आपल्या शारीरिक स्वास्थ्यावर कसा फरक पडतो हे आजच्या लेखातून समजून घेऊ.
तणाव (stress)
तणाव (stress) हा आपल्या आयुष्यातील एक मोठा सोबती आहे, या तणावाचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम आपण समजून घेऊ, तणाव वाढू लागला की मग आपल्या शरीरातील stress hormones (संप्रेरके) – कॉर्टीसोल (cortisol) आणि adrenaline चे प्रमाण वाढू लागते परिणामी आपल्या हृदयाचे ठोके जलद होतात, रक्तदाब (blood pressure) वाढते आणि शरीर सतर्क होते. यांचा हेतू समोर आलेली आपत्ती/ धोका यांचा सामना करणे असला तरीही त्यामुळे शरीरावर याचा नकारात्मक परिणाम देखील होत असतो, वारंवार तणाव आल्याने पुढे उच्च रक्तदाब (hypertension), रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, रक्ताभिसरण संबंधित आजार (cardiovascular problems) होण्याची शक्यता असते.
पचनसंस्था आणि मानसिक आरोग्य
आपले पोट आणि मानसिक आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध आहे, पोट आणि मन यांच्यात अंतर्गत संवाद सतत सुरू असतो त्यामुळे त्यांचा एकमेकांवर परिणाम देखील लगेच जाणवतो, anxiety आणि डिप्रेशन मुळे तर आपल्या पचन संस्थेवर जास्त परिणाम होतो. सतत नकारात्मक विचार आणि ताण यांमुळे भूक कमी होणे, पचन मंदावणे असे विकार सहज जाणवतात.
उदा. एखादी वाईट घटना ऐकली की पोटात गडबड होणे/ पोटात गोळा येणे. सतत जे तणावात असतात त्यांना पचनसंस्थेचे विकार खूप लवकर जडतात. उलट पचन जर व्यवस्थित असेल तर मेंदूमधील रासायनिक क्रिया व्यवस्थित होतात आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहायला मदत होते.
Serotonin नामक एक महत्वाचे संप्रेरक जे आपल्या शरीरात मेंदू पासून येणारे संकेत पोहोचवते, शरीरातील एकूण serotonin पैकी 95% serotonin ची निर्मिती देखील आपल्या पोटात होत असते.
भावना आणि शारीरिक आरोग्य
दुःख, अती तणाव आणि anxiety या मानसिक समस्यांचा परिणाम शरीरावर होऊन डोके दुखणे, स्नायू दुखणे ( muscle pain), पोटाचे विकार असे काही शारीरिक आजार आपल्या पाठी लागतात, परंतु जर यांच्याकडे फक्त शारीरिक आजार समजून इलाज केले तर यांचे मूळ कारण दुर्लक्षित राहते आणि उपचारांना यश येत नाही. या आजारांची लक्षणे शारीरिक असतात परंतु त्यांचे मूळ मानसिक असते, अशा आजारांना आपण मनोदैहिक म्हणजेच psychosomatic आजार म्हणतो.
मनोदैहिक (psychosomatic) आजारांचा शरीरावर होणारा परिणाम –
✒️ कंटाळा येणे / निरुत्साह
✒️ निद्रानाश
✒️ अंगदुखी / पाठदुखी
✒️ उच्च रक्तदाब
✒️ श्वास घेण्यात अडचण
✒️ अपचन
✒️ डोकेदुखी / अर्धशिर्शी
✒️ वंध्यत्व ( impotency)
✒️ शरीरावर rash येणे
✒️ तोंड येणे
✒️ Ulcer
उदा. अनेकदा डोके दुखी किंवा पोटाच्या विकारासाठी आपण अनेक चाचण्या करतो परंतु त्यात काहीच निदान होत नाही, अशा वेळी आजाराचे मूळ हे मानसिक असू शकते. त्यामुळे उपचारात शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही आयामांचा अभ्यास करणे गरजेचे ठरते.
रोगप्रतिकारशक्ती आणि मानसिक स्वास्थ्य
सतत स्ट्रेस आणि नकारात्मक भावनांमुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ लागते, सतत वाढलेले कॉर्टिसोल हे आपल्या रोगप्रतिकारशक्ती साठी सर्वात घातक असते, सतत तणावात असलेल्या व्यक्तींचे शरीरात वाढलेल्या stress hormones मुळे रोगप्रतिकारक पेशी (immune cells) बनण्याचे प्रणाम देखील कमी होऊ लागते. त्यामुळे सतत चिंतेत असणाऱ्या लोकांना सहज आजारपण येते.
रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने एकूणच weakness/ कमजोरी आणि सोबतच अन्य विषाणूजन्य आजारांचा देखील प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढीस लागते.
उदा. एखादी व्यक्ती सतत तणावात असेल तर त्यांना साथीचे आजार किंवा सर्दी – खोकला खूप सहज होतो.
आपले शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य हे एकमेकांत गुंतलेले असून, आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी दोघांचा समन्वय ठेवणे खूपच गरजेचे असते.



