आपल्या आयुष्यात अनेक प्रकारचे लोक आपल्याला भेटत असतात, व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्ती प्रमाणे नानाविध स्वभावाची माणसे आयुष्यात येतात. एखादी व्यक्ती भावनिक असेल तर अनेकदा तिच्याशी कसे वागायचे हे कळत नाही. समोरची व्यक्ती भावनिक झाली की आपण देखील अशांत होऊन जातो. आजच्या लेखात अशाच भावना प्रधान लोकांशी कसे वागावे यावर आपण थोड्या टिप्स पाहणार आहोत.
✳️ समोरच्या व्यक्ती काय सांगायचा प्रयत्न करत आहे, त्याच्या भावना काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करा, शब्दांबरोबर त्याच्या शारीरिक हालचाली, चेहऱ्यावरील हावभाव, आवाजाचा टोन यांकडे देखील लक्ष द्या.
✳️ समोरील व्यक्ती काय बोलत आहे याकडे नीट लक्ष द्या, तुम्ही लक्ष देऊन ऐकत आहात असे समोरच्याला देखील वाटू द्या, तुमची अन्य कामे / मोबाईल बाजूला ठेवा आणि शांतपणे त्यांचे बोलणे ऐकून घ्या. तुम्हाला त्यांचे पटत नसेल तरीही त्यावेळी त्यांना त्यांची बाजू बोलू द्या.
✳️ जर समोरची व्यक्ती रागावली आहे किंवा तिच्या डोळ्यात अश्रू आहेत तर त्या वेळी परिस्थिती सोडून पळून जाऊ नका/ त्यांच्या भावना इग्नोर करू नका उलट त्यांना जाणीव करून द्या की त्यांचा मूड कसा आहे हे तुम्हाला माहीत आहे. आपण अनेकदा काळजी करत असतो पण ती कधीच बोलून दाखवत नाही त्यामुळे अनेकदा गैरसमज होऊ शकतात त्यामुळे अश्या वेळी समोरची व्यक्ती एकटी नाही तिला समजून घेणारं कुणीतरी आहे हे दाखवून देणे योग्य ठरते.
✳️ स्वतःला बरे वाटावे किंवा कटकट नको म्हणून समोरच्या व्यक्तीला शांत करण्याचा प्रयत्न करू नका, समोरची व्यक्ती नाराज आहे याला काहीतरी ठोस कारण असते, जे कदाचित तुमच्यासाठी शुल्लक असेल पण त्या व्यक्ती साठी मोठे असू शकते. त्यामुळे “आत्ता शांत हो, नंतर बघू” ऐवजी “तुझा प्रॉब्लेम खरा आहे, मला खात्री आहे की यावर काहीतरी मार्ग निघेल” अशा आशयाचे बोलणे करावे.
✳️ स्वतःचे रक्षण करू नका (defensive होऊ नका). समोरची व्यक्ती जेव्हा त्यांच्या भावना मांडत असते तेव्हा त्यांच्या परिस्थिती साठी फक्त तुम्ही कारणीभूत आहात असा समज करून घेणे फार चुकीचे असते. अश्यावेळी त्यांची समस्या समजून घ्या आणि जर तुमचे चुकले असेल तर ती चूक स्वीकारून त्यावर काम सुरू करा. स्वतःचा अनावश्यक बचाव करू नका. समोरची व्यक्ती जेव्हा दुखावली असते तेव्हा तिला तुमच्या चुका दाखवायच्या नसतात उलट तिला काय खटकले / आवडले नाही हे मांडायचे असते.
✳️ आपले active listening स्किल वापरून समस्येची पूर्ण माहिती घ्या, सर्व बाजू समजून घ्या आणि मग त्यावर काय मार्ग निघू शकतो हे ठरवा. सतत प्रश्न विचारा जितकी जास्त स्पष्टता असेल तितके मार्ग काढणे सहज आणि सोपे होते. प्रश्न विचारणे म्हणजे कुणाला irritate करणे किंवा प्रेशर देणे अजिबात नसते उलट प्रश्नांमुळे परिस्थिती आणि निर्णय योग्य प्रकारे समजून घेता येतो.
✳️ पूर्ण लक्ष फक्त समस्येकडे राहील याची खात्री करून घ्या, आपले प्रॉब्लेम solving स्किल पूर्ण क्षमतेने वापरा म्हणजे समोरच्या व्यक्तीचा देखील आपल्यावर विश्वास राहील आणि तुम्हाला देखील त्यांना मदत करणे सोपे राहील.
भावनाप्रधान लोकांशी बोलताना नेहमी शांती आणि संयम ठेवणे योग्य ठरते, त्यांच्या भावना समजून घेतल्या की अनेक समस्या सहज नाहीश्या होऊ शकतात.



