तुम्ही सुखी आणि समाधानी आहात असे तुम्हाला गेल्या आठवड्यात कधी वाटले होते? सतत येणारी नवनवीन आव्हाने अणि जबाबदार्या यांमुळे आपला तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या सर्व गोंधळात आपण अनेकदा दुःखी होत जातो, हे सर्व माझ्यासोबतच का? माझेच आयुष्य असे का आहे? असे अनेक प्रश्न आपल्याला भेडसावत असतात. पंरतु या सर्व दुःखावर मात करू शकणारी एक शक्ति आपण सर्व विसरून गेले आहोत, याच दिव्य शक्ति बद्दल आजच्या लेखात सविस्तर माहिती घेऊ.
आपले आयुष्य बदलून टाकणारी आणि आपल्याला सुख आणि समाधान यांची अनुभुती देणारी दिव्य शक्ति म्हणजेच कृतज्ञता (gratitude).
कृतज्ञतेचे विज्ञान
कृतज्ञता म्हणजे एखाद्या व्यक्ती/ वस्तू याद्वारे आपली मदत झाली म्हणून त्यांचे आभार व्यक्त करणारी क्षणभंगुर भावना नाही, मुळात कृतज्ञता ही आपल्या मन अणि शरीरावर परिणाम करणारी एक शक्तिशाली आणि सर्वसमावेशक भावना आहे. कृतज्ञतेच्या भावनेतून मेंदूत अनेक रासायनिक अभिक्रिया होतात ज्यामुळे शरीरातील dopamine आणि serotonin यांची पातळी वाढीस लागते असे वैज्ञानिक संशोधनातून सिद्ध झाले आहे. Dopamine आणि serotonin हे neurotransmitters आपल्या शरीरातील आनंद आणि मानसिक स्वास्थ्य यांसाठी फारच महत्त्वाचे समजले जातात. त्याच बरोबर कृतज्ञतेच्या भावनेमुळे मेंदूचे रिवॉर्ड सेंटर म्हणजेच बक्षीस केंद्र देखील जागृत होते, त्यामुळे समाधान आणि सुखाची जाणीव होऊ लागते. आपला मेंदू देखील ही भावना पुन्हा पुन्हा अनुभवता यावी म्हणुन प्रयत्न करू लागतो आणि परिणामी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीत आनंद आणि समाधान मिळू लागते.
तणाव नियंत्रण
कृतज्ञता व्यक्त केल्याने आपल्या तणावाचे देखील नियंत्रण होते असे काही अभ्यासातून समोर आले आहे. तणावात असताना अनेकदा आपण कुठे कमी पडत आहोत, आपल्याकडे कोणती संसाधने नाहीत असे नकारात्मक विचार आपल्याला सतत अडकवून ठेवत असतात त्यामुळे शरीरातील cortisol या stress hormone चे प्रमाण वाढू लागते. Cortisol चे शरीरावर देखील अनेक वाईट परिणाम होऊ शकतात. परंतु कृतज्ञतेच्या भावनेतून वर सांगितल्या प्रमाणे शरीरात आनंद देणारे dopamine आणि serotonin असे neurotransmitters वाढू लागतात, cortisol ची मात्रा कमी होते परिणामी तणाव देखील कमी होऊ लागतो. यामुळे आपण समोरील कामांचा / आव्हानांना शांत डोक्याने विचार करू शकतो.
कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय आपल्याला समोरील परिस्थितीचे एक वेगळे रूप दाखवत असते, त्यामुळे आपण घटनेचा अभ्यास एक पेक्षा जास्त दृष्टिकोनातून करू लागतो. आपल्याला वाटणार्या आव्हानांचे रूपांतर संधी मध्ये होऊ लागते, ज्यामुळे विकसनशील दृष्टिकोन (growth mindset) तयार होतो. एकूणच आयुष्यात चढ-उतार आले तरीही आपण खचून न जाता त्यांचा सामना उमेदीने करू लागतो.
आनंदाची आणि समाधानाची भावना
कृतज्ञता व्यक्त केल्याने आपण वास्तवात रहायला शिकतो, आपल्या जवळ काय आहे?, आपण किती भाग्यशाली आहोत याची जाणीव झाल्याने आपोआप आनंद आणि समाधान या भावना आपल्याला अनुभवता येतात. आपल्या स्वभावात असलेल्या नकारात्मक सवयी जसे तक्रार, ईर्षा आणि मत्सर हळूहळू कमी होऊ लागतात.
रोजनिशी/ दैनंदिनी, ध्यान किंवा अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण कृतज्ञता व्यक्त करत राहिलो तर त्याचा आपल्या जीवनावर दूरगामी सकारात्मक परिणाम होतो, अगदी आपल्यासाठी कुणी छोटे काम केले तरीही त्यांना “धन्यावाद” म्हणणे इथून आपण सुरुवात करू शकतो.
नातेसंबंध आणि प्रेम
कृतज्ञता हा गुण येथे देखील खूप उपयोगी ठरतो. अनेकदा आपण आपल्या जवळच्या लोकांना गृहीत धरत असतो. त्यांनी आपल्यासाठी काहीही केले तरीही ते त्यांचे कर्तव्य आहे अशी आपली धारणा होऊन बसते. परंतु आपल्याला जे प्रेम मिळत आहे त्याबद्दल कृतज्ञ राहिल्याने आपले नातेसंबंध अधिक घट्ट व्हायला मदत होते. आपल्याला समोरील व्यक्तीच्या प्रयत्नांची जाणीव आहे असा संदेश त्यातून जातो. एकमेकांविषयी आदर देखील वाढीस लागतो. एकूणच नाते संबंधात प्रेम टिकून राहण्यास फारच मदत होते.
दैनंदिन जीवनात अंतर्भाव
आपल्या दैनंदिन जीवनात कृतज्ञतेचा अंतर्भाव करणे अगदी सोपे आणि सहज आहे. पुढील सोप्या पद्धती वापरून आपण कृतज्ञता अंगीकृत करू शकतो.
- रोजनिशी लिहिणे: येथे आपण दिवसभरात कोणकोणत्या गोष्टींसाठी कृतज्ञ आहोत हे लिहिण्याचा प्रयत्न करावा. अगदी एक चांगले निरोगी शरीर आपल्याकडे आहे इथून आपण कृतज्ञता व्यक्त करण्याची सुरुवात करू शकतो.
- दिवसाची सुरवात कृतज्ञतेच्या भावनेतून करणे: सकाळी उठल्याबरोबर “आजचा नवीन दिवस मला जगायला मिळणार आहे जो मला खूप काही शिकवून जाणार आहे ह्यासाठी मी आभारी आहे.” अशी सुरुवात आपण करू शकतो.
- आपली कुणी कितीही छोटी मदत केली तरीही thank you म्हणा, बस मध्ये तिकीट काढल्यानंतर कंडक्टर ला thank you म्हणुन याची सुरुवात करू शकता.
- अगदी सहज कुणाची तरी मदत करा, एखाद्या वृद्ध व्यक्तीला रस्ता ओलांडून देणे हे देखील एक चांगलेच काम आहे त्यातून तुम्ही तुमच्याकडे असलेल्या शक्तीचा सदुपयोग दुसर्यांची मदत करून करत आहात.
असे अनेक छोटे मार्ग अवलंबून तुम्ही कृतज्ञता सहज व्यक्त करू शकता.
अशाश्वत आणि आव्हानांनी भरलेल्या आयुष्यात कृतज्ञतेच्या भावनेतून आपल्याला एक सकारात्मक आणि दीर्घकाळ आनंद देणारा जोडीदार लाभला आहे. या शक्तीने आपण आपले आयुष्य, नातेसंबंध आणि दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकतो. आजपासूनच या भावनेचा अंगीकार करुया.



