उद्या म्हणजेच 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुका होत आहेत. मूलभूत सुविधा, शहराचा विकास, सार्वजनिक व्यवस्था, शिक्षण आणि सुरक्षितता या सर्व निर्णयांचे केंद्रबिंदू नगरपालिका असते. त्यामुळे उद्याचा मतदान दिवस फक्त एक औपचारिकता नसून आपल्या जीवनाचा आणि मानसिकतेचा महत्त्वपूर्ण क्षण आहे. आपल्या एका मताने आपल्या मानसिकतेवर काय आणि कसा परिणाम होतो ते आजच्या लेखातून समजून घेऊ.
मतदान म्हणजे सक्रिय नागरिकत्वाची भावना
निवडणूक केंद्रावर मतदान करताना वरकरणी आपण एक साधी कृती करत असतो. पण त्या कृतीचे मानसिक परिणाम फार मोठे असतात.
मतदान करताना “मी महत्त्वाचा आहे.” आणि “माझ्या मताला देखील किंमत आहे.” या विचाराला पुष्टी मिळते.
Alfred Bandura यांनी Self-Efficacy संकल्पनेत सांगितलेल्या प्रमाणे,
जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला प्रभावशाली समजते तेव्हा तिचा आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि जीवनावरील नियंत्रणभाव वाढीस लागतो.
मतदान ही त्या भावनेची प्रत्यक्ष अभिव्यक्ती आहे.
“फरक काही पडत नाही” या विचारातून बाहेर पडणे
समाजात एक सामान्य धारणा ऐकू येते —
“मी मत दिलं नाही तरी चालतं.”
किंवा
“एका मताने काही बदलत नाही.”
मानसशास्त्र सांगते की अशा विचारसरणीतून learned helplessness निर्माण होते.
Seligman यांच्या संशोधनानुसार, व्यक्ती वारंवार निष्क्रिय होते तेव्हा तिचा मेंदू सक्रियपणे प्रयत्न करणे सोडून देतो, यातूनच हतबलता वाढीस लागते आणि नैराश्य निर्माण होते. थोडक्यात निष्क्रियता – हतबलता – नैराश्य हे एक चक्र सुरू होते.
मतदान केल्याने या चक्रात अडथळा निर्माण होतो.
“मी प्रयत्न करतोय. बदल शक्य आहे.”
या विचाराने व्यक्तीला आशा मिळते.
सामाजिक बांधिलकी आणि मानसिक सुरक्षा
मतदानाचा दिवस आपण एक सामुदायिक भावना अनुभवत असतो.
रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांची दृश्ये, वृद्धांचे सजग पाऊल, नव्या मतदारांचा उत्साह ही सगळी क्षणचित्रे आपण एक मोठ्या कुटुंबाचा भाग आहोत याची आपल्याला जाणीव करुन देत असतात.
Maslow यांच्या पिरॅमिडमध्ये Belongingness म्हणजेच आपलेपणाची गरज ही मानसिक स्थैर्याची आवश्यक पायरी आहे असे नमूद केले आहे.
मतदानाचा अनुभव “मी या शहराचा हिस्सा आहे” ही जाणीव निर्माण करतो त्यामुळे आपले मानसिक संतुलन मजबूत होण्यास मदत होते.
बटरफ्लाय इफेक्ट: छोट्या कृतीचा प्रचंड परिणाम
नैसर्गिक विज्ञान व सामाजिक मानसशास्त्रातील बटरफ्लाय इफेक्ट असे सांगतो की
एका छोट्या हालचालीतून मोठी साखळी प्रक्रिया सुरू होऊ शकते.
उद्याचे तुमचे एक मत
– एखाद्या प्रामाणिक व्यक्तीला सत्तेत आणू शकते,
– चुकीच्या धोरणांना थांबवू शकते,
– शहराची प्रगती घडवून आणू शकते.
हा परिणाम लगेच दिसत नाही.
पण लोकशाहीत छोटे निर्णयच मोठी दिशा ठरवतात हे देखील आपण लक्षात घेतले पाहिजे.
नवीन मतदारांच्या हातात आशेची किल्ली
पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांसाठी उद्याचा दिवस ऐतिहासिक आहे.
पहिली कृती मनावर कायमची कोरली जाते.
नवीन मतदार जेव्हा मतदान करतात, तेव्हा ते फक्त एका निवडणुकीचा भाग राहत नाहीत तर
ते स्वतःचे विचार, ऊर्जा आणि मानसिक पुढाकार घेणाऱ्या समजायचा पाया घालत असतात.
पहिले मतदान म्हणजे लोकशाही मूल्यांची पहिली वीट.
जुन्या व अनुभवी मतदारांचा अमूल्य वारसा
अनेक वर्षांपासून न चुकता मतदान करणाऱ्यांनी या प्रणालीला जिवंत ठेवले आहे.
त्यांच्या सातत्यामुळे लोकशाही टिकून आहे,
त्यांच्या मतदानात अनुभव, समज आणि शहराशी बांधिलकी सामावलेली असते.
नियमित मतदान करणारा नागरिक समाजाच्या आरोग्यासाठी आधारस्तंभ ठरतो.
गुप्त मतदान: मनाची स्वतंत्र जागा
भारतीय निवडणूक प्रक्रियेतील सर्वात मौल्यवान वैशिष्ट्य म्हणजे गुप्त मतदान.
हा अधिकार मानसिक पातळीवर स्वातंत्र्य देतो.
आपण कोणाला मत देतो हे पूर्णपणे खाजगी असते.
कुटुंबाचा दबाव नाही, पक्षाचा आग्रह नाही, समाजाचे निरीक्षण नाही.
हे स्वातंत्र्य नागरिकाला स्वतःच्या मूल्यांनुसार निर्णय घेण्याची परवानगी देते.
हे मानसिक आरोग्यासाठी संरक्षण कवचासारखे आहे.
“People get the government they deserve”
हे वाक्य टीका नाही; तर स्मरण आहे.
लोकांनी सहभाग घेतला तरच शासन सामर्थ्यवान आणि संवेदनशील होते.
लोकांनी पाठ फिरवली तर निर्णय इतर घेतात आणि त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात.
मतदान म्हणजे परिणामांचे वाटेकरी होण्याचा एक निर्णय.
तक्रार करण्याऐवजी योगदान देण्याची एक विचारपूर्ण संधी.
एक आवाहन
म्हणून उद्या एक छोटी कृती करा
मतदान ओळख पत्र किंवा आधार कार्ड , अन्य कोणतेही मान्य फोटो ओळख पत्र घ्या आणि आपल्या मतदान केंद्रात जा, रांगेत उभे रहा आणि मत द्या.
तुमचे मत तुमच्या शहराला दिशा देईल.
तुमचा सहभाग तुमचे मानसिक आरोग्य मजबूत करेल.
आणि तुमचे मत आपल्याला हक्काची लोकशाही परत देईल.
उद्या मतदान करा —
कारण आपली एक छोटी कृती आपल्याला एक सुंदर, सुरक्षित भविष्य देऊ शकते.



