आत्मविश्वास ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली समजली जाते. आत्मविश्वास एक जन्मजात प्रतिभा नसून एक सकारात्मक विचारसरणी आहे जी आपल्याला प्रगतीच्या मार्गावरील शिखरे पादाक्रांत करण्यात मदत करत असते. परंतु हाच आत्मविश्वास कमी असेल तर मला अमुक गोष्ट जमेल का?, माझ्याकडून काही चूक तर होणार नाही ना? असे नकारात्मक विचार आपल्याला पाठी खेचू लागतात. आजच्या लेखात आपण आत्मविश्वास वाढविण्याचे काही सोपे मार्ग पाहणार आहोत.
करुणा
आत्मविश्वास वृद्धी साठी करुणा फारच महत्त्वाची आहे, आपण स्वतः बद्दल जास्त कठोर होऊ नये उलट स्वतःला समजून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा. प्रत्येकजण चुका करत असतो त्यामुळे स्वतःला अपराधी आणि निरुपयोगी न समजता, चूक का झाली आणि ती दुरुस्त कशी करता येईल या मुद्द्यांवर विचार करावा. त्यामुळे आपल्याला अमुक गोष्ट जमणारच नाही असा नकारात्मक विचार न येता आपण चूक सुधारून पुढे जाऊ शकतो असा विश्वास वाढीस लागतो.
वास्तववादी ध्येय निश्चिती.
अनेकदा आपण ध्येय निश्चित करताना अवास्तव असे ध्येय समोर ठेवतो, परंतु ते प्राप्त न झाल्यास आपण निराश होतो परिणामी आपला आत्मविश्वास कमी होऊ लागतो. त्यामुळे ध्येय निश्चित करताना मोठ्या कामांचे छोट्या छोट्या कामात विभाजन करावे आणि ध्येय कायम वास्तववादी असावे. त्याच बरोबर आपल्या प्रगतीचा आढावा देखील घेत रहावा.
नकारात्मक विचारांचा सामना.
मानत येणारे नकारात्मक विचार हे आपल्याला स्वतःवर शंका घेण्यास प्रवृत्त करत असतात. अशा वेळी त्यांचा सामना सकारात्मक विचारांनी करावा. आपण कोणत्या गोष्टी केल्या आहेत, आपल्या जमेच्या बाजू कोणत्या, आपल्या क्षमता काय आहेत हे सतत मनाला सांगत रहावे. त्यामुळे कोणत्याही आव्हानांचा सामना करण्याची सवय आपल्याला लागते.
आपले कम्फर्ट झोन सोडणे.
कोणतीही नवीन आव्हाने आली की सर्वात आधी आपल्याला भीती वाटू लागते. आपण हे काम या पूर्वी काहीच केले नाही, आपल्याला हे जमेल की नाही अशी भीती अधिकच त्रास देऊ लागते. पण अशा वेळी जर आपण ती आव्हाने स्विकारली आपला कम्फर्ट झोन सोडला तर आपोआप आपला आत्मविश्वास वाढू लागतो.
आपले मत ठामपणे मांडणे.
आत्मविश्वास वृद्धी साठी आपले मत ठामपणे मांडणे खूपच गरजेचे असते. जेव्हा आपण आपले मत किंवा गरजा योग्य वेळी ठामपणे मांडतो, आपल्या आवडीनिवडी किंवा मतांसाठी कुणाचा दुजोरा आवश्यक नसतो तेव्हा आपला आत्मविश्वास वाढीस लागायला सुरुवात होते.
देहबोली
कोणत्याही परिस्थिती मध्ये शरीर मरगळलेल्या अवस्थेत नसावे, अनेकदा आव्हाने आली की आपले खांदे अचानक गळून पडतात त्या वेळी जाणीवपुर्वक आपण पाठीचा मणका / कणा ताठ ठेवावा. मान उंच ठेवण्याचा प्रयत्न करावा. आपल्या या देहबोली मुळे देखील आपला विश्वास वाढू लागतो. मनात असलेली भीती कमी होऊ लागते.
थोडक्यात आत्मविश्वास जर वाढवायचा असेल तर सर्वात आधी आपण आपल्या विचारसरणीत बदल केले पाहिजेत आणि स्वतः चे कौशल्य विकसित करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. आपला विश्वास हा फक्त नवनवीन आव्हानांना सकारात्मक पद्धतीने सामोरे जाऊन वाढीस लागणार आहे हे स्वीकारून आपण हा प्रवास निरंतर सुरू ठेवायला हवा.



