पालकत्व : सामान्य चुकांचे असामान्य पडसाद

Table of Contents

पालकत्व ही एक खूप मोठी जबाबदारी असते. या प्रवासात असंख्य आव्हाने अणि निर्णय पालकांना घ्यावे लागतात ज्यांचा थेट परिणाम पाल्यांवर होत असतो. आपल्या पाल्याला पोषक वातावरण मिळावे यासाठी पालक अविरत कष्ट घेत असतात परंतु कधीकधी अजाणतेपणी झालेल्या काही घटनांचा पाल्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत असतो. आजच्या लेखात पाल्यांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर विपरीत परिणाम करण्याऱ्या अशाच सामान्य बाबी आपण पाहणार आहोत.

अतिप्रशंसा आणि अतिसंरक्षण

  1. छोट्या छोट्या गोष्टीत अतिप्रशंसा करणे: आपल्या पाल्यांना प्रोत्साहित करणे आवश्यक असले तरीही छोट्या छोट्या गोष्टींत सतत असे केल्याने त्यांच्यात अतिविश्वास (over confidence) वाढू लागतो आपण अमुक एका गोष्टीत सर्वात चांगले आहोत अशी त्यांची धारणा होते आणि त्यांची प्रगती थांबू लागते. त्याच बरोबर बाह्य प्रमाणीकरणाची (external validation) देखील सवय त्यांना लागु शकते.
  2. चुक किंवा अपयशापासून अतिसंरक्षण: आपल्या पाल्यांना वाईट वाटू नये त्यांचे मनोबल खचू नये म्हणून अनेकदा पालक त्यांचे चुक किंवा अपयशापासून संरक्षण करतात, आपल्या पाल्याच्या चुका/ अपयश समोरील व्यक्ती किंवा वस्तू वर ढकलण्याने त्यांच्यात जबाबदारी जाणीव (sense of responsibility) विकसित होत नाही अणि चूक का झाली किंवा आपण अपयशी का झालो हे शोधण्याची सवय विकसित होत नाही.
  3. समस्या निरसन: आपल्या पाल्याला दैनंदिन जीवनात अनेक छोट्या छोट्या समस्या येऊ शकतात त्यामुळे त्या त्यांना सोडवायचा प्रयत्न करू द्यावा, अनेकदा त्यांना समस्याच येऊ नयेत म्हणून आपण प्रयत्न करत असतो किंवा त्यांच्या समस्या आपणच सोडवत असतो परंतु त्यामुळे त्यांची समस्या निराकरण कौशल्ये (problem solving skills ) आणि सामना शक्ति (coping mechanism) कमकुवत होत जातात.

वरील तीनही गोष्टी या एक पालक म्हणून अगदी सहज होत असल्या तरीही आपण थोडा संयम ठेऊन जाणीवपुर्वक यांना टाळायचा प्रयत्न करावा परंतु जेव्हा कुठे गरज असेल तेव्हा पाल्यांना योग्य प्रोत्साहन, त्यांचे संरक्षण अणि समस्या निरसन करताना मार्गदर्शन नक्किच करावे.

तुलना

  1. भावंडांसोबत तुलना: आपल्या पाल्याचे वर्तन, मार्क्स अणि कौशल्ये यांची तुलना त्यांचा भावंडांसोबत अजिबात करू नये. त्यामुळे ज्याची तुलना केली जात आहे त्यात शत्रुत्व, मत्सर (jealousy) अशा भावना विकसित होतात आणि त्यांचा आत्मविश्वास कमकुवत होतो, तसेच ज्या सोबत तुलना होते त्यांचा अतिविश्वास (over confidence) वाढीस लागतो. परिणामी भावंडांचे नाते खराब होऊ लागते.
  2. इतरांशी तुलना: आपल्या पाल्याचे वर्तन, मार्क्स अणि कौशल्ये यांची तुलना त्यांचा वर्गातील किंवा अन्य मित्रमैत्रिणीं सोबत केल्यास त्यांचा आत्मविश्वास कमकुवत होतो आणि आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपण कधीच पालकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही अशी एक भावना त्यांच्यात वाढू लागते.

दुर्लक्ष

  1. भावनिक दुर्लक्ष: भावनांना वयाचे बंधन नसते. त्यामुळे आपल्या पाल्याच्या भावना देखील स्विकारायला शिकायला हवे, त्यांना “रडायला काय झाले?”, “ही काय रडण्यासारखी घटना आहे का?”, “तू अती करत आहेस” असे उद्गार वारंवार ऐकू आले तर ते पालकांशी भावनिक संवाद टाळतात आणि त्यामुळे पुढे जाऊन त्यांच्या भावनांची जाणीव आणि नियोजन यावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे आपल्या पाल्याच्या भावना ऐकून समजून घेणे गरजेचे ठरते.
  2. चिंता आणि भीती: पाल्यांना अनेकदा काही गोष्टींची चिंता/ भीती सतावत असते, तो विषय पालकांसाठी शुल्लक असू शकतो परंतु आपण त्यांच्या वयाचा आणि अनुभवाचा विचार करून त्यावर त्यांना पर्याय दिले पाहिजेत. असे न करता जर आपण त्यांना दुर्लक्षित ठेवले तर त्यांच्या आपल्यावरील विश्वास कमी होत जातो आणि ते एकलकोंडे होऊ शकतात किंवा चुकीच्या ठिकाणी मदतीसाठी जाऊ शकतात ज्यांनी त्यांच्या समस्या अजून वाढतात.

शिस्तीचा अतिरेक

  1. दंड अणि भेद: सतत ओरडणे, शिक्षा देणे, सर्वांसमोर अपमान करणे, मारणे, डांबून ठेवणे, हॉस्टेल मध्ये पाठवू अशा दंड आणि भेद नीतीचा वापर पाल्यांच्या मनावर दीर्घकाळ टिकणारा नकारार्थी परिणाम करतात. यातून शिस्त न लागता भीती, दडपण अणि स्वतः विषयी लज्जा असे नकारात्मक बदल जास्त दिसून येतात.
  2. समजुतीचा अभाव: आपली काय चूक होती आणि आपण काय वागलो असतो तर ते योग्य असते हे पाल्याला समजत नाही तोवर आपण शिक्षा का घेत आहोत हे त्यांना समजणे कठीण असते. त्यामुळे त्यांना समजावून सांगणे हे फारच गरजेचे असते. पालकांनी सकारात्मक पद्धतीने चुका समजावल्या तर पाल्य आपोआप स्वयंशिस्त अंगीकारतात

योग्य सीमा आणि सातत्य

  1. सातत्य अणि अपेक्षा: पाल्य आपल्या पालकांकडून अनेक गोष्टी शिकत असतात, जर पालक म्हणून आपणच सातत्य ठेऊ शकलो नाही तर ते जास्त गोंधळून जातात. आपल्या पाल्याकडून असलेल्या अपेक्षा, त्यांनी पाळायचे नियम आणि सीमा याबाबतीत पालकांनी सातत्य ठेवणे आवश्यक असते. उदा. रात्री झोपायची वेळ कारण नसताना बदलणे. काही चूक झाली तर त्यावर चर्चा न करता सोडून देणे आणि कधीकधी अती चर्चा करणे.
  2. अती लाड: आपल्या लहानपणी आपल्याला मिळाले नाही म्हणून आपल्या पाल्यांना काहीच कमी पडू द्यायचे नाही असा सूर अनेकदा पालकांचा असतो त्याची भावना जरी चांगली असली तरीही त्यातून अती लाड होतात. किमतीही गोष्ट आपल्याला लगेच मिळते असा समज झाल्याने पाल्यांना कसलीच किम्मत राहत नाही.
  3. सीमा: आपल्या सीमा काय आहेत? हे पाल्यांना माहीत होण्यासाठी त्यांचे पालन काटेकोर पणे केले गेले पाहिजे तसे न झाल्यास पाल्य प्रत्येक नियम अगदी सहज घेऊ लागतात आणि नियम तोडले तरीही काही होत नाही असे त्यांना वाटू लागते.

चुकीचे वर्तन

  1. आक्रमक स्वभाव: सतत चिडचिड, ओरडणे, रागावणे, शिव्या देणे, टोमणे मारणे, हिंसा असे प्रकार पाल्यांसमोर झाल्याने ते या गोष्टीला सामान्य मानू लागतात आणि राग आल्यावर असे वर्तन योग्य आहे असा त्यांचा समज होतो म्हणून पालकांनी संयम अंगीकारला पाहिजे.
  2. चुकीच्या सवयी: आपण देखील एक व्यक्ति आहोत अनेक समस्या आपल्याला देखील असतात परंतु आपण वैयक्तिक आयुष्यात अणि प्रामुख्याने पाल्यांसमोर व्यसन, मद्यपान आणि हिंसा करणे कटाक्षाने टाळायला हवे.

प्रेशर कूकर

  1. अति अपेक्षा: आपल्या पाल्याने अभ्यास, खेळ, नृत्य अशा सर्व क्षेत्रात प्रथम यावे असे अनेक पालकांना वाटत असते, आपण पाल्यावर अमुक खर्च करतो म्हणून त्याने त्याचा मोबदला म्हणून हे केलेच पाहिजे नाहीतर त्याला आपल्या कष्टाची किम्मत नाही असा समज पालकांनी दूर केला पाहिजे यामुळे उलट नैराश्य येऊ शकते. आपल्या पाल्याच्या क्षमता समजून घेऊन त्याला प्रतिस्पर्ध्या न करता अनुस्पर्धा करायला पालकांनी शिकवावे.
  2. समतोल: अभ्यास म्हणजे सर्वकाही आणि त्यासाठी पाल्याचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य दुर्लक्षित करणे हा कधीच योग्य पर्याय असू शकत नाही. त्यामुळे एक पालक म्हणून आपण शारीरिक, मानसिक, शैक्षणिक, सामाजिक या सर्वांचा समतोल राखायला हवा.

उपलब्धता

  1. योग्य संसाधने: पाल्यांना वयानुसार योग्य संसाधने उपलब्ध करून देणे हे पालक म्हणून आपले परम कर्तव्य असते. त्यामुळे शैक्षणिक सोबत त्यांच्या भावनिक आणि सामाजिक विकासाला देखील गती मिळते. ही संसाधने म्हणजे चांगले मित्र, घरचे वातावरण त्यांचा दृष्टिकोन विकसित होईल अशा ठिकाणांना भेटी इत्यादी.
  2. संवाद: पाल्याला सर्व काही देत असताना त्याला कुठेही एकटे पाडू नये. त्यासाठी आपण उपलब्ध राहून योग्य संवाद आणि त्याचे निरीक्षण सतत करत राहणे योग्य ठरते. यामुळे आपल्याला त्यांच्या समस्या योग्य वेळात कळतात आणि त्यावर उपाययोजना देखील करता येतात.

सामान्य वाटणार्‍या या चुका एक पालक म्हणून आपण अनेकदा करत असतो परंतु जर त्यांचे पाल्यावर होणारे दूरगामी परिणाम आपण पाहिले तर आपल्याला लक्षात येईल की आपण हे तात्काळ थांबवायला हवे. आपल्या पाल्यांना पोषक वातावरण देणे आणि त्यांच्या भावनिक तसेच मानसिक प्रगतीचा प्रवास सुखद करणे हे आपले मुख्य ध्येय असले पाहिजे. त्यासाठी आपण प्रत्येक कृती ही त्यांचे दूरगामी परिणाम लक्षात घेऊन करायला हवी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Read also

लोकशाही, मानसिक आरोग्य आणि मतदान

उद्या म्हणजेच 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुका होत आहेत. मूलभूत सुविधा, शहराचा विकास, सार्वजनिक व्यवस्था, शिक्षण आणि सुरक्षितता या सर्व निर्णयांचे केंद्रबिंदू नगरपालिका असते.

Read More »
स्वातंत्र्य म्हणजे मर्यादांचा अभाव नव्हे

लक्ष्मणाने सीतेसाठी आखलेली रेषा ही बंधन नव्हती, तर सुरक्षिततेसाठीची एक स्पष्ट सीमा होती. त्या रेषेचा उद्देश सीतेला रोखणे नसून तिला वाचवणे हा होता. रावणाने संरक्षक

Read More »
Scroll to Top

Get updates on whatsapp

"*" indicates required fields

Name*
Receive Updates about*