आपल्यापैकी अनेक लोकांना “नाही” म्हणता येत नाही, नकार हे स्वार्थीपणाचे लक्षण नसून आपली काळजी घेण्याचे (self care) एक महत्वाचे माध्यम आहे. आपल्या सीमा ठरवून योग्य त्या ठिकाणी नकार दिल्याने आपले मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहते. आजच्या या लेखात मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आपण योग्य सीमा का आणि कशा आखायला हव्या हे समजून घेऊ.
सीमा (boundaries) निश्चित करण्याचे फायदे
✒️ मानसिक आणि भावनिक आरोग्य सुदृढ राहते – अनेकदा आपण स्पष्ट नकार न दिल्याने स्वतःला अनावश्यक आणि त्रासदायक परिस्थितीमध्ये घेऊन जातो, आपल्या सीमा निश्चित केलेल्या असतील तर अशा तणावपूर्ण आणि त्रासदायक परिस्थितीतून वेगळे राहणे सहज शक्य होते.
✒️ त्रागा कमी होतो – सीमा निश्चित नसतील तर समोरील व्यक्तीच्या इच्छा पूर्ण करण्यात अनेकदा आपण थकून जातो, आपली चिडचिड सुरू होते. जर योग्य सीमा राखल्या तर हा त्रागा कमी होतो.
✒️ स्वतःची काळजी घेता येते – आपल्या सीमा या आपल्या मानसिक स्वास्थ्याचे रक्षण करतात त्यामुळे आपण स्वतःची योग्य काळजी घेऊ लागतो, आपल्या प्रगतीचा मार्ग सुलभ होतो.
✒️ काम आणि वैयक्तिक आयुष्य यांचा योग्य समन्वय राखता येतो – योग्य सीमा निर्धारित केल्या की आपल्या अतिरिक्त कामाचा ताण आणि राग आपल्या परिवारावर येत नाही त्यामुळे दोन्ही गोष्टींचा समतोल राखला जातो.
✒️ निर्णय क्षमता वाढते – सीमा निश्चित केल्याने आपल्याला काय हवे काय नको हे व्यवस्थित समजते त्यामुळे निर्णय घेताना येणाऱ्या अडचणी कमी होऊ लागतात.
✒️ Over commitment ची समस्या दूर होते – अनेक लोक उत्साहात किंवा भावनेत over commitment/ अती आश्वासने देतात परंतु सीमा निश्चित केल्याने आपण खरंच काय करू शकतो आणि काय आपल्याकडून शक्य होणार नाही हे सहज समजून जाते, परिणामी ही समस्या दूर होते.
✒️ दुसऱ्यांच्या सीमांचा आदर केला जातो – सीमा निश्चित करणारी व्यक्ती दुसऱ्याच्या सीमांचा देखील आदर करते, त्यामुळे नवीन आणि दीर्घकाळ असे मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित होतात.
सीमा निश्चिती कशी करावी ?
सीमा निश्चित करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भावनिक मर्यादा समजून घेणे गरजेचे असते, आपण आपली वेळ, भावना आणि कष्ट यांच्या समन्वयातून कोणती गोष्ट सहज करू शकतो हे समजून घेणे म्हणजे आपली सीमा ठरवणे. सीमा या व्यक्ती आणि अन्य परिस्थितीनुसार वेगवेगळ्या असू शकतात, परंतु त्या निश्चित करताना आपले मानसिक स्वास्थ्य हा आपला मुख्य उद्देश असला पाहिजे.
नकार कधी द्यावा ?
प्रत्येक गोष्टीला नकारच द्यावा का ?, अजिबात नाही नकार हा आपल्या आयुष्याचा समतोल राखण्यात मदत करणारा घटक आहे त्यामुळे कोणतेही नवीन आश्वासने देताना आपल्यावर आधीच असलेल्या जबाबदाऱ्या आणि आपले मानसिक स्वास्थ्य या दोन निकषांचा आवर्जून विचार करावा. जेव्हा एखाद्या नवीन जबाबदारी मुळे आपल्यावर आधीपासून असलेल्या जबाबदाऱ्या अपूर्ण राहतील आणि त्यातून परिस्थती अधिक खालावेल असे वाटेल तेव्हा तिथे नकार निश्चितपणे द्यावा.
नातेसंबंध आणि सीमा निश्चिती.
अनेकदा आपल्याला नातेवाईक किंवा प्रिय व्यक्तींना नकार देताना खूप त्रास होतो, अशा वेळी आपण भावनिक विचाराने त्यांना होकार दिला आणि आपल्याकडून दिलेले आश्वासन पूर्ण होऊ शकले नाही तर नातेसंबंध खराब होण्याची शक्यता वाढते, उलट आपण नकार देऊन त्याची कारणे शांतपणे सांगितली तर समोरील व्यक्ती आपल्याबद्दल गैरसमज करून घेत नाही, त्यामुळे नातेसंबंधात देखील सीमा निश्चित करणे फारच फायद्याचे ठरते.
Corporate culture आणि सीमा निश्चिती.
हल्ली corporate culture आणि work from home मध्ये कामांचे स्वरूप आणि वेळ यांचा ताळमेळ अजिबात बसत नाही, महत्वाकांक्षा आणि मोठी स्वप्ने यामुळे अनेक लोक जास्त काम करत असतात, त्यामुळे स्वतःला आणि परिवाराला मिळणारा वेळ कमी होतो, परिणामी ताण / स्ट्रेस आणि anxiety वाढते, त्यामुळे आपले काम आणि वैयक्तिक आयुष्य यात समतोल राखण्यासाठी योग्य सीमा राखणे गरजेचे ठरते.
कामाच्या ठिकाणी सीमा कशा ठरवावाव्या ?
✒️ आपल्या सहकर्माचारी आणि वरिष्ठांकडून कोणत्या अपेक्षा ठेवाव्यात हे निर्धारित करा.
✒️ कामाची जागा आणि वेळ निश्चित करा. ( वर्क फ्रॉम होम असेल तर कामाची जागा ही झोपण्याच्या जागेपासून वेगळी ठेवा)
✒️ एखादे काम वेळेत संपवण्याची सवय करून घ्या, कामासाठी कंपनीने दिलेला वेळ तपासून घ्या.
✒️ कामाची वेळ संपल्या नंतर ईमेल / कॉल/ मेसेज द्वारे व्यवस्थापनाला कळवा आणि रजा घ्या.
✒️ सुट्टीच्या दिवशी कामाचे फोन घेणे टाळा.
नकार दिल्यानंतर येणारा guilt/ अपराधी पणाची भावना
अनेकदा आपण नकार दिल्या नंतर आपल्याला guilt म्हणजेच अपराधीपणाची भावना आपल्याला सतावू लागते, आपण समोरच्याला मदत करू शकलो नाही म्हणून आपल्याला त्याचा त्रास होतो, अशावेळी पुढील बाबी लक्षात घ्याव्यात.
✒️ सीमा या आपण आपल्या मानसिक आरोग्यासाठी निश्चित केल्या असून त्यामुळे आपणच आनंदी राहणार आहोत.
✒️ समोरच्या व्यक्तीला होकार देऊन त्याला खोट्या आशा न दाखवता आपण त्याची एक प्रकारे मदतच केली आहे असे स्वतःला सांगत रहावे.
✒️ आपण नकार का दिला याची कारणे आपण मनाला सांगत रहावीत किंवा लिहून काढावीत.
नकार कसा द्यावा ?
अनेकांचे संवाद कौशल्य अजिबात चांगले नसते, सरळ नकार देता येत नाही म्हणून ते मग भेटणे/ कॉल टाळणे, अचानक संपर्क बंद करणे असे चुकीचे मार्ग अवलंबत असतात त्यामुळे सबंध खराब होण्याची शक्यता असते.
योग्य शब्दात नकार देणे कधीही गरजेचे असते, पुढील मुद्दे आत्मसात केल्यास नकार दिल्याने गैरसमज होणे कमी होते.
✒️आपण नकार का देत आहोत हे शांतपणे आणि सौम्य भाषेत सांगावे.
✒️ त्यांच्या समस्येची आपल्याला पुरेपूर जाणीव आहे हे शब्द आणि वागण्यातून प्रकट करावे. (empathy)
✒️ आपले मत मांडताना “मी” , “मला” अशा शब्दात सुरुवात करावी – मी सध्या मदत करू शकत नाही, मला आता शक्य होणार नाही.
✒️ समोरील व्यक्तीने विचारल्यास अन्य पर्याय सुचवावे.
सीमा बदलू शकतात का ?
आपले आयुष्य सतत बदलत असते, तसेच आपण देखील आपल्या सीमा या त्यानुसार बदलल्या हव्या, उदा. नोकरी नुकतीच लागली असताना आपण आपल्या मित्राची फी भरू शकलो नव्हतो, पण तेच पगारवाढ झाल्यावर आपली पात्रता असेल तर आपण फी भरायला पुढाकार घ्यायला हवा.
सीमा आपल्या एकूणच प्रगतीसाठी पोषक असल्याने त्या निश्चित करणे फारच आवश्यक असते, तसेच त्यात वेळोवेळी बदल केल्याने आपण एक सुखी आणि परिपूर्ण आयुष्य जगू शकतो हे आपण समजून घ्यायला हवे.




1 thought on “नकार देण्याची कला”
Good content 👍 and gave proper direction to thoughts