आजही अनेकांना असे वाटते की थेरपिस्ट म्हणजे हातात एक अदृश्य जादूची काठी असलेला जादूगारच. , समोर आलेल्या क्लायंटकडे ती फिरवली, एखादा मंत्र म्हटला की क्षणार्धात सगळे प्रश्न सुटले, दुःख नाहीसे झाले, राग कमी झाला, मुलगा “सुधरला”, नातेसंबंध नीट झाले. विशेषतः “थेरपीसाठी आलो म्हणजे लगेच फरक पडला पाहिजे” ही अपेक्षा समाजात खोलवर रुजलेली आहे. पालकांच्या अपेक्षा तर अधिकच अवाजवी असतात एकाच सत्रात त्यांना अपेक्षित बदल दिसला नाही, तर थेरपीवरच प्रश्नचिन्ह उभे केले जाते. आजच्या लेखात याच विषयावर थोडी माहिती आपण घेणार आहोत.
थेरपी नेमकी कशी काम करते?
थेरपी ही कुठलीही झटपट उपचारपद्धती नाही. ती एक प्रक्रिया (process) आहे. जशी एखादी शारीरिक जखम बरी होण्यासाठी वेळ, काळजी आणि योग्य उपचार लागतात, तसाच वेळ मानसिक जखमा भरून येण्यासाठीही लागतो. थेरपीमध्ये हळूहळू व्यक्तीच्या भावना, विचारसरणी, वागण्याचे पॅटर्न समजून घेतले जातात. हा प्रवास टप्प्याटप्प्याने पुढे जातो, एका सत्रात नाही.
समोरची व्यक्ती ओपन व्हायला वेळ का लागतो?
अनेक वेळा क्लायंट पहिल्या काही सत्रांत खूप मोजके बोलतात. यामागे भीती, लाज, अविश्वास, किंवा “आपल्याला समजून घेतले जाईल का?” ही शंका असते. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर, मेंदूचा self-protection mechanism नवीन व्यक्तीसमोर लगेच सगळे उघड करू देत नाही. सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी वेळ लागतो, आणि तीच थेरपीची पहिली गरज असते. त्यामुळे अनेकदा एक किंवा दोन सत्र ही हीच सुरक्षिततेची भावना तयार होण्यासाठी लागतात.
थेरपीमध्ये नेमके काय केले जाते?
थेरपी म्हणजे फक्त सल्ला देणे नाही. थेरपिस्ट क्लायंटच्या विचारांची रचना (thought patterns), भावना (emotions) आणि वर्तन (behaviour) यांचा परस्पर संबंध समजून घेण्यास मदत करतो. अनेक थेरपी पद्धती विचारसरणीवर काम करतात आपण एखाद्या घटनेकडे कसे पाहतो, त्याचा अर्थ कसा लावतो, आणि त्यानुसार आपण कसे वागतो, हे तपासले जाते. त्यातून विचारांचे अयोग्य पॅटर्न unlearn करणे आणि योग्य पॅटर्न स्वीकारणे असा प्रवास साचेबद्ध पद्धतीने थेरपी मध्ये घडवून आणणे अपेक्षित असते.
विचारसरणीवर काम म्हणजे काय?
उदा. एखाद्या विद्यार्थ्याला वारंवार असे वाटते, “मी काहीच करू शकत नाही.” हा विचार मनात आला की त्याच्याबरोबर निराशा, भीती आणि टाळाटाळ करणारे वर्तन येते. थेरपीमध्ये हा विचार तपासला जातो: तो कितपत वास्तवावर आधारित आहे, कुठल्या अनुभवांमुळे तो तयार झाला, आणि त्याऐवजी अधिक वास्तववादी विचार कसा विकसित करता येईल. विचार बदलले की भावना आणि वर्तन हळूहळू बदलू लागते.
“थेरपीचा काहीच फरक पडत नाहीये” असे का वाटते?
असे वाटणे पूर्णपणे स्वाभाविक आहे. अनेक वेळा थेरपीच्या सुरुवातीच्या टप्प्यात व्यक्तीला जास्त अस्वस्थता जाणवते. कारण थेरपीमध्ये आपण अनेकदा दडपून टाकलेल्या आठवणी, वेदनादायक अनुभव किंवा trauma यांच्यावर विचार करतो. मेंदूला या भावना नको असतात, कारण त्या पुन्हा वेदना देतात. म्हणूनच मेंदू resistance निर्माण करतो, परिणामी चिडचिड, कंटाळा, थेरपी टाळण्याची इच्छा निर्माण होते.
न्यूरोसायन्सनुसार, मेंदूचा amygdala भाग धोका ओळखून लगेच संरक्षणात्मक प्रतिक्रिया देतो. जुनी वेदना पुन्हा आठवणे ही घटना मेंदू “धोका” म्हणून गृहीत धरतो. त्यामुळे व्यक्तीला“याचा काही उपयोग नाही.” असे वाटू लागते, प्रत्यक्षात मात्र, ही अस्वस्थता बदलाच्या प्रक्रियेचा एक महत्वाचा भाग असते.
पालकांना बदल का जाणवत नाहीत?
थेरपीमधील बदल बहुतांश वेळा सूक्ष्म (subtle) असतात विचारांची दिशा बदलणे, भावना ओळखण्याची क्षमता वाढणे, प्रतिक्रिया थोडी शांत होणे. हे बदल लगेच बाहेरून दिसत नाहीत. पालकांना मात्र ठळक वर्तनात्मक बदल अपेक्षित असतात, आणि ते न दिसल्यामुळे “थेरपी काम करत नाही” असा निष्कर्ष काढला जातो.
अवाजवी अपेक्षा
एक किंवा दोन सत्रांत संपूर्ण बदल अपेक्षित ठेवणे ही थेरपीबद्दलची सर्वात मोठी गैरसमजूत आहे. मानसिक आरोग्याचा प्रवास सरळ रेषेत होत नाही, कधी प्रगती, कधी मागे जाणे, कधी स्थिरता हे या प्रवासातील टप्पे आहेत. या सगळ्याला वेळ लागतो. थेरपीचा खरा परिणाम हा दीर्घकाळ बदलात असतो, तात्काळ चमत्कारात नाही.
थेरपिस्टकडे जादूची काठी नसते, पण त्याच्याकडे एक वैज्ञानिक दृष्टिकोन, सुरक्षित नाते आणि बदलासाठीची दिशा असते. थेरपी ही “तुमच्यावर काही करून घेण्याची” प्रक्रिया नाही, तर “स्वतःला समजून घेण्याची” आणि हळूहळू बदल घडवण्याची प्रक्रिया आहे. संयम, वास्तववादी अपेक्षा आणि सातत्य हेच थेरपीचे खरे आधारस्तंभ आहेत.



