वर्ष संपत आले की आपल्याला नवीन वर्षाचे वेध लागतात. नवीन वर्षात काय करायचं, आपलं ध्येय–उद्दिष्ट काय असावं, यावर आपण सतत विचार करू लागतो. New Year Resolution म्हणजेच नवीन वर्षाचे संकल्पही मनाशी कुठेतरी ठरलेले असतात.
पण या सगळ्या पुढच्या विचारांत, सरत्या वर्षाने आपल्याला नकळत किती काही शिकवलं आहे, हे मात्र आपण बहुतेक वेळा विसरतो. या वर्षाने आपल्या व्यक्तिमत्वाला नवे पैलू दिलेले असतात. कधी आपल्याला अधिक संयमी केलं असतं, कधी अधिक समजूतदार, तर कधी परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकवलं असतं.
थांबून पाहण्याचा एक क्षण
पुढे धावणे हा मानवी स्वभाव आहे , पुढचं वर्ष, पुढची जबाबदारी, पुढचं यश यांची ओढ आपल्याला कायम भुरळ पाडत असते पण,
मागे पाहण्यासाठी.
स्वतःशी दोन शब्द बोलण्यासाठी.
आणिआपण इथे पोहोचण्यासाठी किती अंतर पार केलं आहे याची जाणीव करून घेण्यासाठी
थांबणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं.
२०२५ ने आपल्याला काय दिलं
२०२५ ने आपल्याला फार मोठं काही दिलं असेलच असं नाही. पण अनेक लहान-लहान गोष्टी नक्की दिल्या.
कठीण परिस्थितीत मिळालेला आधार.
कोणीतरी आपल्यावर दाखवलेला विश्वास.
एखादं काम पूर्ण झाल्यावर आलेली शांत झोप.
आधी अशक्य वाटणारी गोष्ट आज सहज करता येणं.
या गोष्टी आपण क्वचितच नोंदवतो. मात्र खरं तर याच गोष्टी आपल्याला आतून घडवत असतात.
आत्मपरीक्षण का करावे?
कारण आयुष्यात आपल्याला खूप काही शिकवलं जातं, पण स्वतःकडे, आपल्या प्रवासाकडे पाहायला शिकवले जात नाही.
आपण रोज स्वताला सिद्ध करण्याची धडपड करतो असतो, सतत परीक्षा, काम, जबाबदाऱ्या यांनी घेरलेले असतो. पण “मी कसा बदललो?”, “माझ्यात काय चांगलं घडलं?” हे प्रश्न आपण स्वतःला विचारत नाही. आत्मपरीक्षण म्हणजे स्वतःवर बोट ठेवणं नाही. ते म्हणजे स्वतःला समजून घेणं.
जेव्हा आपण शांतपणे आत्मपरीक्षण करतो, लिखित नोंदी ठेवतो तेव्हा कळतं की आपण स्वतःला जितके कमजोर समजत होतो, त्यापेक्षा आपण खूप कणखर आहोत., आज जरी एखादी गोष्ट सोपी वाटत असली तरी ती कधीतरी कठीण होती. आणि आपण ती पार केली आहे. हे कुणी सांगत नाही, ते स्वतः लिहिल्यावरच उमगतं. लिहिल्यावर आपली प्रगती दिसते. आपल्याला मदत करणाऱ्या लोकांची कदर जाणवते. आणि पुढच्या वर्षाकडे पाहताना मन थोडं अधिक स्पष्ट होतं.
मुलांसाठी हे विशेष का महत्त्वाचं आहे
मुलांसाठी आत्मपरीक्षण फार गरजेचं आहे. कारण गुण, क्रमांक, बक्षिसे यापलीकडे जाऊन “मी कसा माणूस होत आहे” हे समजण्याची ही सुरुवात असते. जे मूल स्वतःमधील चांगले बदल ओळखायला शिकतं, ते उद्या अपयश आलं तरी स्वतःला पूर्णपणे चुकीचं ठरवत नाही उलट ते स्वतःत आवश्यक बदल करून फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतं.
खरं सांगायचं तर आपण फक्त टिकून राहिलो नाही. आपण हळूहळू विकसित झालो आहोत. २०२५ ने हे शिकवलं की बदल अचानक होत नाही. तो रोजच्या छोट्या प्रयत्नांतून होतो. कधी आपण अधिक संयमी झालो. कधी अधिक समजूतदार. कधी मदत मागायला शिकलो. कधी स्वतःवर थोडा जास्त विश्वास ठेवायला लागलो. हे बदल मोठे वाटत नसतील, पण हेच बदल पुढची दिशा ठरवतात.
आज स्वतःसाठी थोडा वेळ काढा
म्हणूनच वर्ष संपताना, कोणतीही घाई न करता, आज प्रत्येकाने स्वतःसाठी थोडा वेळ काढावा.
कोणासाठी नाही.
दाखवण्यासाठी नाही.
गुण मिळवण्यासाठी नाही.
फक्त स्वतःशी प्रामाणिक राहण्यासाठी.
आज लिहायचे सात प्रश्न
- २०२५ मध्ये माझ्यासोबत झालेल्या चांगल्या गोष्टी कोणत्या?
- या वर्षात मला कुणाकडून मदत किंवा प्रेरणा मिळाली?
- मला माझाच अभिमान वाटला असे क्षण कोणते?
- या वर्षात माझ्यात झालेले चांगले बदल कोणते?
- आधी कठीण वाटणारी पण आता सोपी झालेली एक गोष्ट कोणती?
- मी या वर्षात काय नवीन शिकलो?
- आणि येणाऱ्या वर्षात मला काय शिकायचं आहे?
एक छोटी विनंती
उत्तर सुंदर असायलाच हवं असं नाही. परिपूर्णही असायलाच हवं असं नाही. कदाचित ते खूप छोटं वाटत असेल पण ते खरं असेल, तर पुरेसं आहे. कारण हा प्रवास स्वतःला समजून घेण्याचा आहे.
२०२५ ला धन्यवाद देत, स्वतःवर थोडा जास्त विश्वास ठेवत आणि मन शांत ठेवत आपण नव्या वर्षाकडे वळूया.
कारण पुढचं वर्ष सुरू होण्याआधी स्वतःशी प्रामाणिक होणं हेच कदाचित सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे.



